| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शुक्रवार दि. ६ जून २०२५
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या प्रगतीचा नवा मार्ग ठरणार असून, लवकरच हा महामार्ग वाढवण बंदराशी थेट जोडण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे आणि सायन-पनवेल मार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीनच्या दक्षिणवाहिनीचे लोकार्पण दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडले. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, तसेच विविध मंत्री, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, 701 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी तब्बल 55,335 कोटींचा खर्च झाला असून, राज्यातील 24 जिल्हे जेएनपीटी बंदराशी याआधीच जोडले गेले आहेत. आता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडला जाणार आहे, ज्यामुळे बंदर विकास आणि निर्यात क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
या महामार्गाचा एक भाग नाशिक व ठाणे जिल्ह्यांतून जातो. सह्याद्रीच्या खडतर पर्वतरांगांमधून मार्ग काढताना मोठे अभियांत्रिकी आव्हान पार करण्यात आले आहे. इगतपुरीजवळचा 8 किलोमीटर लांबीचा बोगदा राज्यातील सर्वात लांब आणि देशातील सर्वात रुंद बोगदा आहे.
महामार्गालगत शेततळी, जलसंधारण, वृक्षारोपण, आणि सौर ऊर्जा निर्मिती यांसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यात 35 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे काम सुरू आहे.
गेल इंडिया कंपनीच्या गॅस वाहिनीमुळे गडचिरोलीसारख्या अंतर्भागांमध्येही गॅस पोहोचवणे शक्य होणार आहे. तसेच महामार्गामुळे अनेक धार्मिक, पर्यटनस्थळे एकमेकांशी जोडली जात आहेत, त्यामुळे अर्थव्यवस्था व पर्यटन दोन्हीला चालना मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी असेही स्पष्ट केले की, महामार्ग व वन्यजीव यांच्या सहजीवनासाठी 100 पेक्षा अधिक विशेष रचना तयार करण्यात आल्या आहेत. भारतात प्रथमच अशा प्रकारची सुविधा साकारली गेली आहे.
आगामी काळात शक्तिपीठ महामार्ग साकारण्यात येणार असून, मराठवाड्याच्या आर्थिक पुनरुज्जीवनात याची मोठी भूमिका राहील.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गामुळे प्रवासाचा वेळ, इंधन आणि प्रदूषण या तिन्ही गोष्टींची बचत होणार आहे. कृषी, पर्यटन, उद्योगक्षेत्रात मोठी प्रगती होणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी तर हा महामार्ग विकासाचा नवीन दुवा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण दिनानिमित्त 10 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जाहीर करत, प्रकल्पासाठी मेहनत घेतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.