yuva MAharashtra पोलिस ठाण्याबाहेर तडजोडीचे प्रकार सहन होणार नाहीत – अधीक्षक संदीप घुगे यांचा स्पष्ट इशारा

पोलिस ठाण्याबाहेर तडजोडीचे प्रकार सहन होणार नाहीत – अधीक्षक संदीप घुगे यांचा स्पष्ट इशारा


फोटो सौजन्य : सांगली पोलीस ऑफिसर्स

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. २० जून २०२५

सांगली जिल्ह्यात गुन्ह्यांच्या तपासात पारदर्शकता राखण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. पोलिस ठाण्याबाहेर कोणत्याही प्रकारची तडजोड, समेट किंवा गुन्हे लपवण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.

गुरुवारी झालेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि पोलीस ठाण्यांचे प्रमुख उपस्थित असताना या सूचनांचा पुनरुच्चार केला. प्रलंबित गुन्ह्यांचा तातडीने निपटारा करावा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

गुन्ह्यात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद
मिरज तालुक्यातील एका गावात झालेल्या लुटमारीच्या घटनेत काही रक्कम परत देण्यात आल्याने आणि त्यात पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटल्याने अधीक्षकांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची विचारपूस करण्यात आली असून दोषींवर कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेतही घुगे यांनी दिले आहेत.
गुन्हे लपवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
“गुन्हा घडूनही त्याची नोंद न करता तडजोडीच्या माध्यमातून तो मिटवण्याचे प्रकार पुन्हा घडल्यास, संबंधितांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा अधीक्षक घुगे यांनी दिला.


कायद्याच्या अंमलबजावणीत अधिक काटेकोरता

आढावा बैठकीत गेल्या महिन्यात घडलेल्या गंभीर घटनांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. आगामी पावसाळी अधिवेशन, तसेच सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अधिकारी सज्ज राहावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

गुन्हे उघडकीस आणणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गौरव

उत्कृष्ट तपासकार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. गुन्हे उकलण्यात पुढाकार घेतल्याबद्दल त्यांना विशेष शाबासकी देण्यात आली.

गुंडगिरी, नशेखोरीवर कठोर कारवाईचा धडाका

मिरजेत झालेल्या गटसंघर्षानंतर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. अवैध शस्त्र व नशाविक्री करणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाईचा बडगा उचलण्यात येत असून, डार्क स्पॉट्स, रेल्वे स्थानक व बस स्थानक परिसरात देखील पोलिसांनी नियमित गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.