| सांगली समाचार वृत्त |
जत - दि. २ जून २०२५
जत तालुक्यातील बाज येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत तब्बल ३० लाख रुपयांच्या निधीचा अपहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शाखा प्रमुख आणि लिपिकाने मिळून सरकारी अनुदानाची रक्कम स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या खात्यांमध्ये वळवली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत बँकेच्या मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी प्रक्रिया हाती घेतली आहे. सध्या शाखेतील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असून, अपहाराची रक्कम आणखी वाढू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे हा गैरव्यवहार २०१७ मध्ये घडला असून, तब्बल आठ वर्षांनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
शासनाच्या शेतकरी अनुदानाचा अपहार
शेतकऱ्यांसाठी शासनाकडून आलेल्या अनुदानातील ३० लाख रुपये अपहार केल्याचे बँकेच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. ही रक्कम बाज येथील तत्कालीन शाखाधिकाऱ्यांनी बँकेच्या खात्यांतून काढून स्वतःसह त्यांच्या नातेवाइकांच्या नावाने वळवली होती.
बँकेच्या लेखापरीक्षण व अंतर्गत तपासणी प्रक्रियेमुळे हा प्रकार उघड झाला. सध्या वरिष्ठ अधिकारी तपासणीसाठी बाज येथे उपस्थित आहेत. याचबरोबर, या प्रकरणाशी संबंधित असलेल्या डफळापूर शाखेचीही चौकशी होणार असल्याचे समजते.
चौकशी यंत्रणांवर प्रश्नचिन्ह
सांगली जिल्हा बँकेत नियमितपणे अंतर्गत तसेच बाह्य लेखापरीक्षण केले जाते. विविध तपासणी यंत्रणा कार्यरत असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात अपहार कसा झाला, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शाखाधिकारी सोलनकर यांचा वादग्रस्त इतिहास
या प्रकरणात सोलंकर नावाचे शाखाधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असून, त्यांचा कारभार पूर्वीपासूनच वादग्रस्त राहिला आहे. शिपाई म्हणून सेवा सुरू करून त्यांनी शाखाधिकारी पदापर्यंत मजल मारली. त्यांच्या कारकिर्दीत याआधीही दोन वेळा वाद निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाला डावलून त्यांनी गोव्यात 'ऑन ड्युटी' दौरा केला होता, ज्यावरून बँकेने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली होती.
बँकेकडून त्वरित कारवाईचे संकेत
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले की, "बाज शाखेतील आर्थिक अपहाराचा प्रकार स्पष्ट झाला आहे. सध्या चौकशी सुरू असून, अंतिम तपशील समोर आल्यानंतर तातडीने योग्य ती कारवाई करण्यात येईल."