yuva MAharashtra सिंधुदुर्गमध्ये भारतातील पहिले पाण्याखालील युद्धनौका संग्रहालय; पर्यटनदृष्ट्या नव्या पर्वाची सुरूवात

सिंधुदुर्गमध्ये भारतातील पहिले पाण्याखालील युद्धनौका संग्रहालय; पर्यटनदृष्ट्या नव्या पर्वाची सुरूवात



| सांगली समाचार वृत्त |
सिंधुदुर्ग - बुधवार दि. ११ जून २०२५ 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक समुद्रकिनारी भारताच्या पहिल्या पाण्याखालील युद्धनौका संग्रहालयाची मुहूर्तमेढ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे रोवली गेली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, मंत्री आदिती तटकरे, शंभूराज देसाई, नितेश राणे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

'INS गुलदार' चे रूपांतर पर्यटनदृष्ट्या आकर्षणात

भारतीय नौदलातील सेवानिवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार आता सिंधुदुर्गच्या समुद्रतळाशी एक अभिनव संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळ रचना म्हणून विराजमान होणार आहे. या उपक्रमामुळे सागरी जैवविविधतेचे संवर्धन होईल, तर स्कुबा डायव्हिंग आणि पाणबुडी पर्यटनाची दारे खुली होतील. हा प्रकल्प भारतात पहिल्यांदाच राबवण्यात येत असून, जगातील अनेक देशांप्रमाणे महाराष्ट्रानेही सागरी पर्यटनात क्रांतिकारक पाऊल टाकले आहे.

केंद्र सरकारचा पाठिंबा, ४६.९९ कोटींचा निधी मंजूर

केंद्र सरकारच्या विशेष पर्यटनस्थळ विकास योजनेंतर्गत या प्रकल्पासाठी रु. ४६.९९ कोटींचा निधी २७ डिसेंबर २०२४ रोजी मंजूर करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या सहमतीने भारतीय नौदलाने आयएनएस गुलदार हे जहाज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास (MTDC) विनामूल्य सुपूर्द केले आहे.

युद्धनौकेचा प्रवास: अंदमान ते सिंधुदुर्ग

१२ जानेवारी २०२४ रोजी सेवानिवृत्त झालेल्या या १,१२० टन वजनाच्या, ८३.९ मीटर लांबीच्या आणि ९.७ मीटर रुंदीच्या युद्धनौकेचा कारवार नेव्हल बेसवर २२ फेब्रुवारीला ताबा घेण्यात आला. त्यानंतर १६ मार्च २०२५ रोजी हे जहाज विजयदुर्ग येथील सागरी मंडळाच्या जेट्टीवर सुरक्षितपणे आणण्यात आले. पर्यावरणीय शुद्धता पूर्ण करण्यासाठी नियुक्त संस्थेने १५ एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण साफसफाई पूर्ण केली.

पाण्याखालील स्थापनेची तयारी

१६ एप्रिल २०२५ रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांना या युद्धनौकेला समुद्राच्या तळाशी स्थापन करण्यासाठी अधिकृत कार्यदिशा देण्यात आली आहे. हवामान अनुकूल असेल त्या दिवशी हे ऐतिहासिक जहाज समुद्रात स्थापन केले जाईल. त्याभोवती प्रवाळ निर्मिती केली जाईल आणि भविष्यात स्कुबा डायव्हिंग व पाणबुडी सफरीच्या माध्यमातून पर्यटकांना समुद्रतळावरची ही अनोखी अनुभूती घेता येईल.


पर्यटन व सागरी संवर्धनाचा मिलाफ

हा प्रकल्प पर्यटनाला नवी दिशा देणारा ठरेलच, पण सागरी जीवनसंवर्धनासाठीही एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. पाण्याखालील संग्रहालय, कृत्रिम रीफ आणि जहाजाच्या इतिहासाचे दर्शन हे सर्वजण पर्यटकांना एक अविस्मरणीय अनुभव देतील.