| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ११ मे २०२५
अलीकडे भारताने रशियाकडून S-400 डिफेन्स सिस्टिम्सची यशस्वी खरेदी केली, आणि त्याबद्दल कौतुकाची लाट उसळली. अमेरिकेचा दबाव झुगारून घेतलेला हा निर्णय निश्चितच देशाच्या संरक्षण क्षमतेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरतो. पण या मोठ्या करारामागे एक अशी व्यक्ति होती, जिने नेपथ्यात राहूनही मोलाचा वाटा उचलला — मनोहर पर्रीकर.
संरक्षण मंत्री म्हणून पर्रीकरांनी जबाबदारी स्वीकारली तेव्हा मंत्रालय अनेक वर्षांच्या निर्णय ठप्प अवस्थेत अडकलेले होते. पण त्यांनी ही स्थिती लवकरच बदलली. राफेल विमानांच्या खरेदीपासून ते S-400 च्या व्यवहारापर्यंत त्यांनी धाडसी आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले.
S-400 प्रणाली शत्रूच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना आणि हवाई हल्ल्यांना ३८० किमीपर्यंतच्या अंतरावरच निष्प्रभ करू शकते. ही प्रणाली भारताने ५ युनिट्सच्या स्वरूपात खरेदी केली, आणि यामागचा विचार पर्रीकरांच्या कार्यकाळातच सुरू झाला होता.
पर्रीकरांची खरी दूरदृष्टी तेव्हा समोर आली, जेव्हा त्यांनी S-400 च्या खरेदीनंतर संपूर्ण एअर डिफेन्स योजनेचा फेरविचार करण्यास सुरुवात केली. हवाई दलाच्या आधीच्या योजनेनुसार पुढील १५ वर्षांत शॉर्ट आणि मिडीयम रेंजच्या तब्बल २०० प्रणाली खरेदी करायच्या होत्या. पण S-400 मुळे या गरजेत मोठी घट होईल, हे त्यांनी तांत्रिक अभ्यासाद्वारे ओळखले.
या आढाव्यामुळे एअरफोर्सने स्वतःची योजना बदलली — आणि परिणामी, देशाचे ४९,३०० कोटी रुपये वाचले!
‘इकॉनॉमिक टाइम्स’नेही या पुढाकाराचं कौतुक करत त्याला रेअर एक्सरसाईज म्हटलं — कारण सामान्यतः संरक्षण मंत्री इतक्या सखोल चर्चांमध्ये सहभागी होत नाहीत. पण पर्रीकर अपवाद ठरले.
काम करणारे खूप असतात, पण जबाबदारीनं विचार करून देशहितासाठी निर्णय घेणारे मोजकेच असतात. मनोहर पर्रीकर हे त्यांच्यातले एक होते — शांत, अभ्यासू, पण ठोस पावलं उचलणारे.
---
साभार : ओंकार दाभाडकर यांच्या पोस्टवर आधारित