| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ४ मे २०२५
मिरज येथील शासकीय रुग्णालयात तीन दिवसांच्या नवजात बाळाच्या अपहरणाची धक्कादायक घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कविता समाधान आलदर या महिलेस काही दिवसांपूर्वी या रुग्णालयात पुत्ररत्न प्राप्त झाले होते.
आज (३ मे) सकाळी ११ च्या सुमारास कविता आलदर आपल्या बाळासोबत बेडवर झोपल्या असताना एक अनोळखी महिला त्यांच्याजवळ आली. तिने बाळाला इंजेक्शन (डोस) द्यायचा असल्याचे सांगून बाळ ताब्यात घेतले. मात्र, बराच वेळ उलटून गेला तरी ती महिला परत आली नाही. यामुळे संशय बळावल्याने आलदर कुटुंबीयांनी बाळाचा शोध घेण्यास सुरुवात केली.
रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, संबंधित महिलेने बाळासह रुग्णालयाबाहेर निघून जातानाचे दृश्य कैद झाले आहे. विशेष म्हणजे, ती महिला मागील तीन दिवसांपासून रुग्णालय परिसरात सतत फिरताना दिसून आली आहे, असे देखील सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.
ही महिला सुरक्षा व्यवस्थेला फसवून बाळ घेऊन निघून गेल्याने मोठी हलचल निर्माण झाली आहे. संतप्त झालेल्या बाळाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर नाराजी व्यक्त केली असून, याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पथक तातडीने तपासासाठी रवाना करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण मिरज परिसरात खळबळ उडाली आहे.