yuva MAharashtra करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसराचा कायापालट – चारही बाजूंचा परिसर होणार खुला !

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसराचा कायापालट – चारही बाजूंचा परिसर होणार खुला !

फोटो सौजन्य : दै. सकाळ

| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. १७ मे २०२५

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आणि 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाणारे श्री अंबाबाई मंदिर, भाविकांचे महान श्रद्धास्थान, लवकरच नव्या रूपात समोर येणार आहे. मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकास आराखड्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असून, त्यानंतर मंदिर परिसर चारही दिशांनी मोकळा होणार आहे. कोणत्याही दरवाज्यातून कुठेही जाता येईल, असा सोयीस्कर रचना असणार आहे.

प्रथम टप्प्यातील कामे:

सुरुवातीला बिनखांबी गणेश मंदिर ते दक्षिण दरवाजा या दोन एकर भागातील अडथळे दूर करून परिसर खुला केला जाणार आहे. यानंतर महाद्वार रोड व जोतिबा रोडच्या दिशेने विस्तार होईल. अंतिम टप्प्यात सरलष्कर भवन आणि शेतकरी संघाच्या इमारतींलगतचा विकास केला जाईल. या संपूर्ण योजनेसाठी सुमारे 11 एकर क्षेत्र कव्हर होणार असून, त्यापैकी साडेचार एकर जागा संपादन केली जाणार आहे.


मंदिर आवारात 64 योगिनींचे जतन व संवर्धन, तसेच मंदिराची मजबुतीकरणाची कामे केली जातील. याशिवाय नगारखाना, गरुड मंडप आणि मनकर्णिका कुंडांच्या सौंदर्यीकरणासाठीचे 104 कोटींचे काम आधीच सुरू झाले आहे.

भाविकांसाठी दर्शन रांगेच्या दोन्ही बाजूंना पूजेचे साहित्य आणि पारंपरिक वस्तूंसाठी दुकाने असतील. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मंच, बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह अशा सर्व सोयी उपलब्ध असतील.

भुयारी दर्शन मार्गात सुमारे सात हजार भाविक एकत्र दर्शनासाठी उभे राहू शकतील. हॉलमध्ये आरामदायी जागा, पाणी आणि शौचालयांचीही व्यवस्था असेल. पार्किंगसाठी बिनखांबी गणेश मंदिर ते दक्षिण दरवाजा दरम्यानचा भाग निवडण्यात आला असून, 50 चारचाकी वाहने आणि एक शहरी बस (KMT) यासाठी जागा असेल.


दुसऱ्या टप्प्यातील वैशिष्ट्ये:

भवानी मंडप परिसरात 'हेरिटेज प्लाझा' उभारण्यात येणार असून, त्याद्वारे ऐतिहासिक वारशाचा नव्या रूपात विकास केला जाईल. पर्यटकांसाठी आकर्षक आणि माहितीपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

अंबाबाई मंदिराच्या किरणोत्सव मार्गात येणारे अडथळे आणि अतिक्रमणे दूर करून या अनोख्या उत्सवाचा आनंद भाविकांना पूर्ववत मिळावा, यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र बाजारपेठ विकसित केली जाणार असून, त्यांच्या व्यवसायावर कोणताही परिणाम न होऊ देता नव्या जागेवर पुनर्वसन केले जाईल.

प्रकल्पाचा एकंदर आराखडा:

एकूण खर्च: 1445 कोटी 97 लाख रुपये

भूसंपादन: 980 कोटी 12 लाख रुपये

(पहिला टप्पा: 257 कोटी रुपये)


विकासकामे: 465 कोटी 85 लाख रुपये

(पहिला टप्पा: 200 कोटी रुपये)