| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २६ मे २०२५
राज्यात मान्सूनपूर्व पावसाने राज्यात हाहा:कार मागविला असून मुंबईत आज सोमवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने शहरासाठी यलो अलर्ट जारी केला असून, काही वेळात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू झाला आहे. भरतीमुळे पावसाचे पाणी समुद्रात मिसळू शकत नसल्याने जलनिकासी अडथळ्यांत सापडते. यामुळेच शहरातील सखल भागांमध्ये आणि रेल्वे मार्गांवर पाणी साचले आहे.
माटुंगा आणि मस्जिद बंदर रेल्वे स्थानकांवर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले असून, मस्जिद बंदर स्टेशनवर तर फलाटाच्या पातळीपर्यंत पाणी पोहोचल्याने वाहतुकीवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. सध्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील गाड्या सरासरी 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. याचा परिणाम म्हणून सकाळी ऑफिसला निघालेल्या प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. त्याचप्रमाणे, पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे, तर पूर्व द्रुतगती मार्ग आणि एलबीएस मार्गावरील भांडूप, कांजूरमार्ग आणि सायन परिसरात वाहतूक संथ गतीने सुरु आहे.
मुंबई महापालिकेने या परिस्थितीचा तातडीने आढावा घेत आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केल्या असून, जलनिकासी सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.