yuva MAharashtra ‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी गतीशील हालचाली; सांगली आणि सावंतवाडीत जमीन मोजणी होणार सुरू !

‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी गतीशील हालचाली; सांगली आणि सावंतवाडीत जमीन मोजणी होणार सुरू !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ मे २०२५

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला ‘शक्तिपीठ महामार्ग’ आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या उंबरठ्यावर आहे. राज्यभरात विविध ठिकाणी जमीन मोजणीच्या प्रक्रियेला वेग मिळत असून, अडथळा निर्माण होणाऱ्या भागांमध्ये नोटिसा देण्याचे काम सुरू आहे. विशेषतः पूर्वी विरोध नोंदवलेले सांगली आणि सावंतवाडी येथे आता अधिकृत नोटिसा देण्यात आल्या असून, प्रत्यक्ष मोजणीची प्रक्रिया कोणत्याही क्षणी सुरू होण्याची शक्यता आहे.

सावंतवाडीत १७ मेपासून मोजणीस प्रारंभ

सावंतवाडी परिसरात १७ मेपासून जमीन मोजणी सुरू होणार असून, डेगवे तलाठी कार्यालयाकडून याबाबत संबंधितांना सूचना बजावण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आपापल्या क्षेत्रातील सर्व्हे नंबरमध्ये सकाळी ९.३० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मोजणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित भूभाग संपादन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, काही संघटनांनी या प्रक्रियेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत मोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष प्रतिकार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


सांगलीत पोलिस बंदोबस्तात मोजणीची तयारी

सांगली जिल्ह्यातही लवकरच जमीन मोजणी सुरू होणार असून, आधीच शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे गरज भासल्यास पोलिस बंदोबस्तात मोजणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. यासंदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली असून, मिरज व विटा प्रांताधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भूमी अभिलेख विभागाकडे मोजणीसाठी आवश्यक शुल्क जमा करण्यात आले आहे.

७ हजाराहून अधिक शेतकरी बाधित होणार

शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज आणि आटपाडी तालुक्यांतून जाणार असून, एकूण १९ गावांचा या मार्गात समावेश आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ७,६११ शेतकरी प्रभावित होणार असून, ६१६.६७ हेक्टर जमीन महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे.

विरोध कायम; अन्नत्याग आंदोलनाची घोषणा

शक्तिपीठ महामार्गाविरोधात विविध राजकीय आणि सामाजिक संघटना सक्रिय झाल्या आहेत. मनसेने सरकारवर टीका करत तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे. तसेच, महिला सरपंचांसह ठाकरेंच्या शिवसेनेने देखील मोजणीविरोधात आवाज उठवला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे निमंत्रक दिंगबर कांबळे यांनी महामार्ग रद्द करण्याची जोरदार मागणी करत १ मेपासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे.