yuva MAharashtra लाडक्या बहिणींचा सरकारवर फसवणुकीचा आरोप; श्रीरामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल !

लाडक्या बहिणींचा सरकारवर फसवणुकीचा आरोप; श्रीरामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल !


| सांगली समाचार वृत्त |
श्रीरामपूर - दि. १ मे २०२५

"मुख्यमंत्री लाडकी बहीण" योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची घोषणा महायुती सरकारने जुलै महिन्यात केली होती. तसेच, निवडणुकीपूर्वी प्रचारादरम्यान हे अनुदान सत्तेत आल्यानंतर 2100 रुपयांपर्यंत वाढवले जाईल, असे वचनही नेत्यांकडून देण्यात आले होते. 

सध्या महायुतीचे सरकार राज्यात सत्तेवर आहे आणि त्याला 100 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही अनुदान वाढवले गेले नाही. उलट, काही महिलांचे 1500 रुपयांचे अनुदानही थांबवण्यात आले असून, आता केवळ 500 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.


यामुळे नाराज झालेल्या महिलांनी श्रीरामपूर येथील पोलिस ठाण्यात थेट सरकारविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. शेतकरी महिला सुनिता वानखेडे आणि कोमल वानखेडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याविरोधात पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीत निवडणूकपूर्वी दिलेले आश्वासन पाळले गेले नाही, तसेच लाभ बंद केल्याने फसवणूक झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अर्ज स्वीकारला आहे. मात्र गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी संघटनांनी इशारा दिला आहे की, जर वेळेवर कारवाई झाली नाही, तर 5 मे रोजी संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. या प्रकरणामुळे ‘लाडकी बहीण’ योजना चर्चेचा विषय बनली असून, सरकारवरचा जनतेचा दबाव वाढत आहे.