| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ मे २०२५
सांगली – वैशाखातील तापत्या उन्हाच्या झळा अजूनही जाणवत असतानाच यंदाच्या मे महिन्यात पावसाने चांगलाच जोर दाखवला आहे. गेल्या सात दिवसांत जिल्ह्यात तब्बल १२७ मिमी पावसाची नोंद झाली असून, ही पर्जन्यमानाची मात्रा सरासरीच्या अडीच पट अधिक आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली.
गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत वाळवा व शिराळा तालुक्यांतील पाच प्रमुख ठिकाणी अतिवृष्टी झाली. यामध्ये कामेरी मंडळात सर्वाधिक ९०.३ मिमी पाऊस नोंदवण्यात आला आहे. यामुळे येरळा नदीला पूर आला असून, अनेक ओढे व नाले भरून वाहू लागले आहेत.
अंतर्गत महाराष्ट्रात वीस वर्षांनंतर प्रथमच वळवाच्या जोरदार सरी अनुभवायला मिळाल्या आहेत. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सलग चार दिवस पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारपर्यंतच्या २४ तासांत वाळवा तालुक्यातील वाळवा (७६ मिमी), कुरळप (६८.८ मिमी), कामेरी (९०.३ मिमी), चिकुर्डे (७०.३ मिमी), व कोकरूड (६५ मिमी) या ठिकाणी भरपूर पावसाची नोंद झाली आहे.
इतर तालुक्यांतील पावसाचे आकडे पुढीलप्रमाणे: मिरज – १९.५ मिमी, जत – ८.४ मिमी, खानापूर – २२.८ मिमी, वाळवा – ५६.७ मिमी, तासगाव – २३.९ मिमी, शिराळा – ३६.८ मिमी, आटपाडी – १८.१ मिमी, कवठेमहांकाळ – २७ मिमी, पलूस – १९.४ मिमी, आणि कडेगाव – २९.४ मिमी. एकूण जिल्ह्याचा सरासरी पाऊस २९.३ मिमी इतका झाला आहे.
या सततच्या पावसामुळे येरळा नदीला पूर आला असून, कडेगाव तालुक्यातील भाळवणी येथील पुलावर पाणी पोहोचले आहे, तरीही वाहतूक सुरळीत सुरू आहे. तासगाव तालुक्यातील ओढे-नाल्यांना पूर आला असून, बुधवारपासून काही भागांत तळी फुटल्यामुळे नद्यांना अचानक पुराचे स्वरूप आले आहे.
तासगाव तालुक्याच्या डोंगरसोनीसह पूर्व भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शेतांमधून वाहत आलेल्या पाण्याने रस्ते जलमय झाले असून गावातील ओढे दुथडी भरून वाहत आहेत. तासगाव शहरात देखील अर्धा ते पाऊण तास सततधारेने जोरदार पाऊस पडला. जत व आटपाडी वगळता इतर सर्व तालुक्यांतही कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली.
सांगली व मिरज शहरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. रात्रीच्या सुमारास सांगलीतील स्टेशन चौक, झुलेलाल चौक आणि मिरजमधील दत्त मंदिर मैदान परिसरात पाणी साचून तलावासारखे दृश्य निर्माण झाले होते.