| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ मे २०२५
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेचा रोड मॅप तयार करण्यात आला असून, याचाच एक भाग म्हणून घंटागाड्या यांना रोडमॅप देण्यात आले आहेत. सकाळी 6 वाजता घंटागाडी बाहेर पडली पाहिजे. एखाद्या प्रभागात घंटागाडी उशीर आल्यास संबंधित चालकावर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा उपायुक्त स्मृती पाटील यांनी महापालिकेत घंटागाडीचालकांच्या आयोजित बैठकीत दिला आहे. स्वच्छता कामात घंटागाडी चालकांनी हलगर्जिपणा केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही स्मृती पाटील यांनी दिला आहे.
महापालिका क्षेत्रातील घंटागाड्या चालकांची बैठक उपायुक्त स्मृती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत पार पडली या बैठकीस मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक याकुब मद्रासी तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक आणि घंटागाडी चालक व मुकादम उपस्थित होते. यावेळी बोलताना उपायुक्त स्मृती पाटील म्हणाल्या की, सर्व घंटागाडी चालकांनी सकाळी 6 वाजता आपली घंटागाडी ही बाहेर काढलीच पाहिजे. जे याबाबत कंटाळा करतील त्यांच्यावर दंडात्मकबरोबर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याचबरोबर सकाळी 10 ते 12 या वेळेत घर टू घर कचरा संकलन झालेच पाहिजे, तर 12 ते 2 दरम्यान अपार्टमेंटमधील कचरा संकलित केला पाहिजे.
घंटागाडी प्रभागात फिरत असताना त्यावरची ध्वनी यंत्रणा ही सुरू असणे आवश्यक आहे, अशा सूचनाही उपाय स्मृती पाटील यांनी दिल्या. आयुक्त सत्यम गांधी यांनी तिन्ही शहर स्वच्छतेच्या संदर्भात केलेल्या नियोजनानुसार घंटागाडी चालकांनी आपल्याला दिलेल्या रोडमॅप प्रमाणे कचरा संकलित करायचा आहे. यामध्ये हलगर्जीपणा झाल्यास संबंधित घंटागाडी चालकांवर दंडात्मक बरोबर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या कामात कोणीही कंटाळा किंवा हलगर्जीपणा करू नये अशा सूचनाही स्मूर्ती पाटील यांनी सर्व घंटागाडी चालकांना केली आहे.