yuva MAharashtra नागज फाट्यावर दूध टँकरवर छापा : १० लाखांचे भेसळयुक्त गाय दूध नष्ट !

नागज फाट्यावर दूध टँकरवर छापा : १० लाखांचे भेसळयुक्त गाय दूध नष्ट !


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ६ मे २०२५

कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाट्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने रविवारी दुपारी अचानक छापा टाकून दूध वाहतूक करणाऱ्या पाच टँकरची तपासणी केली. यावेळी एकूण ७५ हजार लिटर दुधाची प्राथमिक चाचणी घेण्यात आली. यामध्ये ३०,३९६ लिटर गाय दुधात भेसळ आढळून आल्यामुळे अंदाजे १० लाख ६३ हजार रुपयांचा साठा घटनास्थळीच नष्ट करण्यात आला.

सहाय्यक आयुक्त (अन्न) निलेश मसारे, अन्न सुरक्षा अधिकारी पवार आणि स्वामी, तसेच नमुना सहाय्यक कवळे आणि कसबेकर यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. टँकरमधील दुधाची ‘इन्स्टंट स्ट्रिप’च्या मदतीने चाचणी घेण्यात आली. या वेळी कोल्हापूरकडे जाणाऱ्या तीन टँकरमधील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.


विशेषतः, MH 09 GR 5567 या क्रमांकाच्या टँकरमधील दुधात मीठाची भेसळ आढळून आली. याच टँकरमधील उर्वरित साठा — ३०,३९६ लिटर गाय दूध — तात्काळ नष्ट करण्यात आले. प्राथमिक चौकशीत या दुधाचा साठा सांगोला तालुक्यातील घेरडी येथील एलकेपी दूध शितकरण केंद्रातून निघून कोल्हापूरमधील एका कंपनीकडे जात असल्याचे समोर आले आहे. घेतलेल्या नमुन्यांचे प्रयोगशाळा विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.

भेसळीबाबत नागरिकांनी तक्रार करावी

खाद्यपदार्थांमध्ये भेसळ असल्यास किंवा तत्संबंधित काही तक्रारी असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या सांगली कार्यालयाशी थेट संपर्क साधावा. तक्रारी ई-मेलद्वारे fdasangli@gmail.com या पत्त्यावरही पाठवता येतील, असे आवाहन सहाय्यक आयुक्त निलेश मसारे यांनी केले आहे.