yuva MAharashtra ७ मे रोजी देशभरात मॉक ड्रिल; सायरनसह स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण !

७ मे रोजी देशभरात मॉक ड्रिल; सायरनसह स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण !


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ६ मे २०२५

पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवार, ७ मे रोजी देशभरात सर्वसमावेशक मॉक ड्रिल (रंगीत तालीम) आयोजित करण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत.

दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू असून, याच दरम्यान त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी टेलिफोनवर चर्चा केली. पुतीन यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करत भारताला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. जपाननेही भारताच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

देशांतर्गत सज्जतेचा आराखडा

गृह मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार, मॉक ड्रिल अंतर्गत हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवले जातील. नागरीकांना आणि विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. वीजपुरवठा खंडित करून ब्लॅकआउट परिस्थितीचा सराव होईल, तर महत्त्वाच्या सेवा आणि कृती गुप्तपणे हाताळल्या जातील. या सरावामागे उद्देश आहे की, संभाव्य संकट काळात विविध यंत्रणांमधील समन्वय सुरळीत व्हावा.


प्रधानमंत्री पातळीवर हालचाली

पंतप्रधान मोदी यांनी या पार्श्वभूमीवर संरक्षण सचिव राजेशकुमार सिंह यांच्याशी सोमवारी सविस्तर चर्चा केली. त्याआधी त्यांनी हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांच्याकडून हवाई दलाच्या सज्जतेचा आढावा घेतला होता. नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनीदेखील मोदी यांची भेट घेतली होती. या बैठकांचे तपशील जाहीर करण्यात आले नसले तरी पाकिस्तानविरुद्ध संभाव्य पावले उचलण्याच्या दिशेने ही हालचाल महत्त्वाची मानली जात आहे.

पाकिस्तानविरोधात भारताची ठाम भूमिका:

भारताने पहलगाम हल्ल्याशी संबंधित पुरावे G20 देशांच्या राजदूतांना सादर केले आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी दहशतवादाला आणि त्यामागे असलेल्या शक्तींना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, अशी ठाम भूमिका मांडली होती. याअंतर्गत सैन्य दलांना योग्य वेळ आणि उद्दिष्ट ठरवण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

आतापर्यंतची कारवाई

  • सिंधू जलवाटप करार स्थगित

  • पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द

  • व्यापार व्यवहार थांबवले

  • भारतीय बंदरांमध्ये पाकिस्तानी जहाजांना मज्जाव

  • लष्कर, नौदल, वायुदल प्रमुखांच्या बैठका

  • सर्वपक्षीय बैठकीत कारवाईचा ठराव

  • विरोधकांचाही सरकारला पाठिंबा


  • ७ मेच्या मॉक ड्रिलमध्ये काय होणार?

  • सायरनद्वारे हवाई हल्ल्याचा इशारा

  • नागरीक व विद्यार्थ्यांना संरक्षणाचे प्रशिक्षण

  • वीज बंद करून ब्लॅकआउट परिस्थितीची तयारी

  • संवेदनशील माहिती व सुविधा गुप्त ठेवण्याचे सराव

  • यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचा अभ्यास