yuva MAharashtra दुधगावच्या पंचकल्याण महोत्सवात सोनसाखळी चोरणाऱ्या महिलांची टोळी अटकेत

दुधगावच्या पंचकल्याण महोत्सवात सोनसाखळी चोरणाऱ्या महिलांची टोळी अटकेत


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ मे २०२५

दुधगाव (ता. मिरज) येथे ८ मे रोजी झालेल्या पंचकल्याण महोत्सवात गर्दीचा फायदा घेत अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी दागिने विकण्यासाठी बुधगाव परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईत चार महिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटकेत आलेल्या महिलांची नावे पुढीलप्रमाणे –

लक्ष्मी बाळू सकट (२४, राजेंद्रनगर झोपडपट्टी, कोल्हापूर)
दीपाली अशोक काळे (४०, संभाजीनगर, जयसिंगपूर)
सोनू हरी काळे (३५, वाल्मीकी आवास, सांगली)
शारदा बंटीनाथ हातळगे (४, जयसिंगपूर)


बोलवाड (ता. मिरज) येथील शकुंतला शशिकांत पाटील या महोत्सवासाठी दुधगाव येथे आल्या होत्या. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांनी जेवण करून हात धुण्यासाठी जाताना गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरीला गेले. याप्रकरणी त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.


गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपास सुरू ठेवत संशयित महिलांवर नजर ठेवली होती. बुधगाव हायस्कूलजवळ त्या महिलांकडून दागिने विक्री होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्वांना अटक केली आणि गंठण हस्तगत केले.

ही कारवाई सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या पथकात सहायक फौजदार मेघराज रूपनर, अभिजीत पाटील, बंडू पवार, सचिन कोळी, मनोज नीळकंठ, हिंमत शेख, आणि मनीषा कोरे यांचा समावेश होता.