yuva MAharashtra पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज आणि कॉलप्रकरणी तरुणाला पुण्यातून अटक !

पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज आणि कॉलप्रकरणी तरुणाला पुण्यातून अटक !

फोटो सौजन्य  : Wikimedia 

| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. ३ मे २०२५

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि वारंवार फोन कॉल करून त्रास दिल्याच्या प्रकरणात एका २५ वर्षीय तरुणाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव अमोल काळे असून, तो बीड जिल्ह्यातील परळीचा रहिवासी आहे. सध्या तो शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्यास होता.

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी ही कारवाई करत पुण्यातील भोसरी परिसरातून अमोल काळे याला ताब्यात घेतले. भाजपाच्या मुंबईतील कार्यालयातील सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे यांनी नरिमन पॉइंट पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

तक्रारीनुसार, मंत्री पंकजा मुंडेंना काही दिवसांपासून आरोपीकडून सातत्याने अश्लील आणि त्रासदायक मेसेज तसेच फोन कॉल येत होते. पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास सुरू केला असता, याचे सूत्र पुण्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अमोल काळे याला अटक करण्यात आली.


प्राथमिक चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ७८, ७९ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काळे याने कॉल आणि मेसेजमधून अश्लील भाषा वापरून मंत्री मुंडेंना मानसिक त्रास दिला होता. या प्रकारामागे वैयक्तिक कारण आहे की अन्य काही हेतू, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसेच, या प्रकरणात इतर कुणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.