| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ मे २०२५
सांगलीच्या राजवाडा चौकातील अपर तहसील कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अशोक काकडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजयकुमार पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, अपर तहसीलदार अश्विनी वरूटे, तहसीलदार लीना खरात, महावितरणच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त होत असतात. यामुळे गरजू रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अर्जाच्या पाठपुराव्यासाठी मंत्रालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. हा त्रास कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हा स्तरावर पूर्ण क्षमतेने मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
सांगलीतील या कक्षाचे उद्घाटन फीत कापून व दीप प्रज्वलन करून पार पडले. या नविन कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आवश्यक माहिती स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे. अर्जामधील त्रुटी दूर करून प्रक्रिया सोपी केली जाणार असून गरजू रुग्णांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ अधिक सहजतेने मिळणार आहे. यामुळे वेळेची आणि खर्चाची बचत होणार असून, जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
या कार्यक्रमास डॉ. राम लाडे, कपिल पाटील, अनुपमा बोंगळे, श्री. सोनवझे, श्री. खाडे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.