| सांगली समाचार वृत्त |
धुळे - दि. २२ मे २०२५
धुळे शहरातील राजकीय वातावरण बुधवारी अचानक तापले, जेव्हा विधिमंडळाच्या अंदाज समितीतील ११ आमदार जिल्हा दौऱ्यावर असताना, शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुलमोहर शासकीय विश्रामगृहात धडक दिली.
विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ ला अनिल गोटेंच्या नेतृत्वाखाली कुलूप लावण्यात आले. या खोलीत अंदाज समितीतील आमदारांना ‘मलिदा’ स्वरूपात वाटपासाठी साडेपाच कोटी रुपयांची रोकड आणण्यात आली आहे, असा गंभीर आरोप गोटेंनी केला आहे. या आरोपानंतर गोटे आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी खोलीबाहेर ठाण मांडून बसले आहेत.
गोटेंची स्पष्ट मागणी
गोटे यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीतच खोली उघडण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, मोठ्या प्रमाणात विकासकामांमधील भ्रष्टाचार झाकण्यासाठीच ही रक्कम आमदारांना दिली जात आहे.
विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये मोठी रक्कम ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर गोटे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, आणि महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी सदर खोलीला कुलूप लावले आणि तिथेच बसून जागा रोखून धरली.
प्रशासनाची उदासीनता, भ्रष्टाचाराचे आरोप तीव्र
या प्रकरणाची माहिती अँटी करप्शन ब्युरो, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आली असतानाही चार ते पाच तास उलटले तरी कोणीही घटनास्थळी पोहोचलेले नाही, अशी तक्रार गोटे यांनी केली आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेवरूनही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या संपूर्ण प्रकरणामागे शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर, जे अंदाज समितीचे अध्यक्ष आहेत, यांच्यावरही संशयाची सुई वळवण्यात आली आहे.