yuva MAharashtra ३५ वर्षांनंतर मे महिन्यात पंढरपूरात चंद्रभागेला पूरस्थिती; मंदिरं, जुना पूल पाण्याखाली !

३५ वर्षांनंतर मे महिन्यात पंढरपूरात चंद्रभागेला पूरस्थिती; मंदिरं, जुना पूल पाण्याखाली !


| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - दि. २७ मे २०२५

पंढरपूर | मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्हा आणि भीमा-निरा खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रभागा नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी निरानृसिंहपूर येथून सुमारे ३० हजार क्यूसेक्स वेगाने सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रभागेचा जलपात्र अचानक भरून वाहू लागले. यामुळे १९९० नंतर प्रथमच, तब्बल ३५ वर्षांनंतर, मे महिन्यात नदीला पूर आला आहे.

सोमवारी सकाळी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पूर्णतः पाण्याखाली गेले आहेत. भीमा पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, संभाव्य धोका लक्षात घेता खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.

या पूरामुळे पंढरपूरातील जुना दगडी पूल आणि वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरे जलमय झाली आहेत. पूलाजवळ आणि घाटांवर बॅरेकेटिंग लावून प्रवेश रोखण्यात आला आहे. पंढरपूर नगरपरिषदेची अग्निशमन यंत्रणा, पोलीस आणि प्रशासनाने नदीपात्रात बोटींमार्फत गस्त वाढवली आहे.


स्थानिक प्रशासनाचे अधिकारी – उपमुख्याधिकारी अ‍ॅड. सुनील वाळुजकर, कार्यकारी अभियंता हरसुरे, अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले, आरोग्य अधिकारी तोडकर – या सर्वांनी पूरनियंत्रण उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.

दरम्यान, चंद्रभागा नदीकिनारी वसलेल्या व्यास नारायण झोपडपट्टी आणि अंबाबाई पटांगण परिसरातील रहिवाशांना स्पीकरच्या माध्यमातून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.