| सांगली समाचार वृत्त |
इचलकरंजी - दि. २४ मे २०२५
"इचलकरंजीत पुन्हा सहा महिन्यांनी आलो आहे. गेल्यावेळी संघर्षाचा काळ होता, आता मात्र विकासाचा काळ सुरू आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकारातून आयोजित ‘विकास पर्व’ सभेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, "आपल्या सरकारला सहा महिने पूर्ण झाले आहेत. याकाळात कार्यालयीन कामकाजात स्पर्धा निर्माण करून शंभर दिवसांचा यशस्वी कार्यकाल पार पाडला आहे. २०१९ मध्ये आम्ही महापुरासंदर्भात जागतिक बँकेकडे प्रस्ताव सादर केला होता. आता त्या प्रकल्पासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे."
अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीवर बोलताना त्यांनी सांगितले, "कोल्हापूर आणि सांगली परिसरात अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, त्यामुळे वारंवार पूरपरिस्थिती निर्माण होते. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आवश्यक वाटल्यास आपण या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात लढा देऊ."
‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "ज्या भगिनींच्या सिंदूराला काश्मीरमध्ये धक्का पोहोचवला, त्या प्रत्येक वेदनेचा सडेतोड प्रतिशोध घेतला आहे. जवळपास १०० दहशतवाद्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केला. युद्धविराम पाकिस्तानने विनंती करून मागितला. आम्ही पाक नागरिकांवर कुठलाही अन्याय केला नाही."यावेळी काँग्रेसवर टीका करताना त्यांनी म्हटले, "एकीकडे आमचा राहुल तिरंगा यात्रेच्या माध्यमातून जवानांच्या पराक्रमाला सलाम करतो, तर दुसरीकडे दुसरा राहुल शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. देशात पाकिस्तानी मानसिकता रुजवणाऱ्यांचाच मोठा धोका आहे."
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत इचलकरंजी मतदारसंघात अनेक विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे उपस्थित होते.
इचलकरंजीच्या दीर्घकालीन पाणीप्रश्नावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य करत सांगितले की, "हा प्रश्न ३०-४० वर्षांपासून प्रलंबित आहे. आमदार राहुल आवाडे हे प्रत्येक वेळी या प्रश्नाची आठवण करून देतात. हा विषय प्राधान्याने सोडवणार आहोत. यासोबतच इचलकरंजी महापालिकेच्या जीएसटी परताव्याचा निर्णय दोन महिन्यांत घेतला जाईल. पंचगंगा नदीच्या प्रदूषणावरही आराखडा तयार केला असून, केंद्र सरकारच्या सहकार्याने या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करणार आहोत." असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.