| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ मे २०२५
गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात तासगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले असून, या प्रकल्पासाठी जमिनीचा कितीही मोठा मोबदला दिला तरीही तो स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. महामार्गाच्या चर्चेसाठी आलेल्या शासकीय अधिकारी व मोनार्क कंपनीच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांनी चर्चेला थारा दिला नाही, तसेच 'महामार्ग रद्द झालाच पाहिजे' असा पवित्रा घेतला.
या प्रकल्पामुळे शेती, पर्यावरण आणि स्थानिक जीवनशैलीवर गंभीर परिणाम होणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात शंभरपट रक्कम दिली, तरीही ते शक्तिपीठ प्रकल्पाला मंजुरी देणार नाहीत. त्यामुळे चर्चेचा कोणताही प्रयत्न निष्फळ ठरतोय. शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता अधिकारी व प्रतिनिधींना अखेर माघार घ्यावी लागली.दरम्यान, कवलापूर येथील भूषण गुरव व इतर बाधित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या महामार्गाला विरोध करणारे निवेदन दिले. त्यांनी शासनाला पुन्हा एकदा सांगितले की, हा प्रकल्प राबवला गेल्यास भविष्यातील पिढ्यांचे जीवन धोक्यात येईल, तसेच पुराचा संभाव्य धोका अधिकच वाढेल.
शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की, आम्ही आमचा संघर्ष शेतातच लढू आणि त्यासाठी प्रसंगी रक्त सांडण्यालाही मागेपुढे पाहणार नाही. कोणतीही चर्चा न करता हा प्रकल्प त्वरित रद्द करण्यात यावा, अशी त्यांची ठाम मागणी आहे.
या आंदोलनावेळी शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीचे उमेश देशमुख, सतीश साखळकर, महेश खराडे, प्रभाकर तोडकर, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हारुगडे, सुनील पवार, सुधाकर पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.