yuva MAharashtra सांगलीत महसूल विभागाच्या गतिमान कार्यासाठी विशेष कृती मोहीम !

सांगलीत महसूल विभागाच्या गतिमान कार्यासाठी विशेष कृती मोहीम !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ एप्रिल २०२५

मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी महसूल कर्मचाऱ्यांना कार्यपद्धती अधिक जलद, पारदर्शक व जनतेच्या हिताची बनवण्याचे आवाहन केले. मिरज शहरात तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी विशेष कृती कार्यक्रमाअंतर्गत गतिमान अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी श्री. दिघे होते.

या प्रशिक्षण शिबिरात तहसीलदार, नायब तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी व सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विषयांवर मार्गदर्शन देण्यात आले. यामध्ये 'ई-चावडी', 'ई-हक्क प्रणाली', 'ई-पीक पाहणी', '६ गठ्ठा पद्धती' यांसह 'हिंदू व मुस्लिम वारसा कायदे' या विषयांचा समावेश होता. विशेष म्हणजे श्री. कोतवाल यांनी वारसा कायदे आणि हिब्बानामा यावर सखोल माहिती दिली.


शिबिरानंतर कर्मचाऱ्यांच्या सेवेशी संबंधित अडचणींवर खुलेपणाने चर्चा करण्यात आली. याशिवाय, केंद्र व राज्य सरकारच्या कर्मयोगी अभियानांतर्गत अधिकाधिक ऑनलाइन कोर्स पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी उपविभागीय अधिकारी श्री. दिघे यांनी महसूल यंत्रणेची कार्यपद्धती अधिक पारदर्शक व गतिशील करण्यासाठी प्रभावी उपाय सुचवले.

कार्यक्रमात मिरज तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, सांगली अप्पर तहसीलदार वरुटे, तासगाव तहसीलदार अतुल पाटोळे, कवठेमहांकाळ तहसीलदार अर्चना कापसे यांच्यासह महसूल विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ग्राम महसूल अधिकारी संजय खरात यांनी केले.