yuva MAharashtra विले-पार्ले पूर्व मुंबई जैन मंदिर प्रकरण : राज्य अल्पसंख्याक आयोगासमोर प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी मांडली बाजू !

विले-पार्ले पूर्व मुंबई जैन मंदिर प्रकरण : राज्य अल्पसंख्याक आयोगासमोर प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी मांडली बाजू !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २३ एप्रिल २०२५

विले-पार्ले पूर्व मुंबई येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदीर मुंबई महापालिका प्रशासनाने जेसीबी लावून पाडल्यामुळे देशभर जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे. याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगांने आज मुंबईत महापालिका व पोलिस अधिकारी, श्री १००८ पार्श्वनाथ जैन मंदीर ट्रस्ट कमिटी व दक्षिण भारत जैन सभा पदाधिकारी यांची सुनावणी घेतली. 

दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष मा. भालचंद्र पाटील आणि चेअरमन मा. रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रा. एन. डी. बिरनाळे महामंत्री यांनी दक्षिण भारत जैन सभेची बाजू राज्य अल्पसंख्याक आयोगासमोर मांडली. प्रा. बिरनाळे म्हणाले, 'अहिंसक व शांतीप्रिय जैन समाजाचे मंदीर उध्वस्त करुन मुंबई महापालिका प्रशासनाने, मुंबई, महाराष्ट्र व संविधानाचा आणि सहिष्णुतेचा अपमान करुन निंदनीय व अशोभनीय काम केले आहे. संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे तातडीने निलंबन करावे आणि होते त्याच जागेत महापालिका प्रशासनाने मंदीर बांधून द्यावे. तसेच राज्यातील जैन तीर्थक्षेत्रं, जिनमंदीरे, साधू साध्वी, श्रावक श्राविका आणि अल्पसंख्याक शिक्षण संस्था यांच्यावर अन्याय व आक्रमण होऊ नये.. अशा दुर्दैवी घटनांना पायबंद घालण्यासाठी शासनाला आयोगाने सूचित करावे असेही म्हणणे मांडले. 


यावेळी सुनावणी संपताच प्रा. एन.डी.बिरनाळे, प्रा. डॉ. पंकज बिरनाळे आणि किरण मगदूम यांनी समक्ष विलेपार्ले येथील महापालिकेने पाडलेल्या जैन मंदीर स्थळावर भेट देऊन दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने पहाणी केली.. सुनावणीदरम्यान विले-पार्ले पूर्व मुंबई येथील भ. पार्श्वनाथ जिन मंदीर व दिगंबर जैन समाज अध्यक्ष अनिल शहा, विश्वस्त प्रजेश शहा, अॅड निधी छेडा, विलेपार्ले श्वेतांबर संघाचे अध्यक्ष प्रविणभाई शहा, उपाध्यक्ष भरतभाई, शहा, विश्वस्त मयूर शहा, सदस्य जे. एन.शहा, अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक फेडरेशनचे सहकार्यवाह विकास अच्छा,महावीर जैन, मुनी निलेशचंद्रजी विजय मोहनखेडा मध्यप्रदेश, माधवबाग राठी नाशिक व विले-पार्ले जैन समाज कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी विले-पार्ले येथील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदीर कमिटीचे व समाजाचे पदाधिकारी व सदस्यांनी दक्षिण भारत जैन सभेच्या समाज व धर्मरक्षण कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढले दि. २४ एप्रिल रोजी सांगलीत संपन्न होणाऱ्या भव्य आक्रोश मोर्चाला शुभेच्छा दिल्या.