| सांगली समाचार वृत्त |
पहलगाम - दि. ३० एप्रिल २०२५
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात घडलेल्या हल्ल्यानंतर सातत्याने शोध मोहिम राबवणाऱ्या भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. या हल्ल्यामध्ये सहभागी असलेले सर्व सहा दहशतवादी अखेर लष्कराच्या जाळ्यात सापडले आहेत. सध्या या दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु आहे. पोलिस व लष्करी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे दहशतवादी गेल्या आठवड्याभरापासून फरार होते आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, डोंगराळ भाग आणि अवघड मार्गांमुळे ते चालतच प्रवास करत होते. त्यांना शोधून काढून काश्मीरच्या जंगलात लष्कराने चारही बाजूंनी घेरले आहे.
घटनास्थळी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये तीव्र गोळीबार सुरु असून, या दहशतवाद्यांकडे शस्त्रे व एक चिनी बनावटीचा सॅटेलाइट फोन असल्याचेही सांगितले जात आहे. त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी रात्रंदिवस काम केले. कोबिंग ऑपरेशन्स, एनआयए तपास आणि स्थानिक पातळीवरील माहितीच्या आधारे हे यश मिळाले. या दहशतवादी गटामागे पाकिस्तानचा माजी स्पेशल फोर्स कमांडो आणि सध्या लष्कर-ए-तैयबाशी संलग्न असलेला हाशिम मूसा याचा हात असल्याचे पुरावे समोर आले आहेत. मूसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपकडून प्रशिक्षित असून भारतात दहशतवादी कारवायांसाठी सक्रिय होता. सध्या सीआरपीएफ, बीएसएफ आणि भारतीय लष्कराच्या संयुक्त पथकांकडून ऑपरेशन राबवले जात आहे. ही मोहीम यशस्वी ठरल्यास पहलगाम हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांना निष्प्रभ करण्यास मोठे योगदान ठरणार आहे.