yuva MAharashtra सांगली, मिरज परिसरात शिवजयंतीचा पारंपरिक जल्लोष !

सांगली, मिरज परिसरात शिवजयंतीचा पारंपरिक जल्लोष !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० एप्रिल २०२५

सांगली आणि मिरज परिसरात शिवजयंतीनिमित्त उत्सवाचा जल्लोष अनुभवायला मिळाला. विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या पुढाकाराने शहरात शिवप्रतिमांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, पुढील पाच दिवस विविध सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राजवाडा चौकात जोशात शिवोत्सव

हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने सांगलीतील राजवाडा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विधिपूर्वक स्थापित करण्यात आली. यावेळी लाठी-काठी, तलवारबाजी आणि मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. रिसाला रोड येथील भाजी मंडईत 'शिवोत्सव 2025' चा प्रारंभ मातोश्री महिला भाजी विक्रेता संघाच्या पुढाकाराने झाला. या प्रसंगी संभाजी भिडे यांनी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. या प्रसंगी नितीन शिंदे, स्वाती शिंदे, गजानन मोरे, निखिल सावंत, कल्पना जाधव आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिवसेना (ठाकरे गट) कडूनही शिवरायांना मानवंदना

कॉलेज कॉर्नर येथे शिवसेना (ठाकरे गट) च्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरप्रमुख अनिल शेटे यांच्या नेतृत्वाखाली आयोजीत या कार्यक्रमात 2 मे रोजी सायंकाळी 6 वाजता हलगी-कैताळ वादन स्पर्धा होणार आहे. कार्यक्रमात प्रसाद रिसवडे, ओंकार देशपांडे, गजानन खरात आदी उपस्थित होते. स्टेशन चौक, कुपवाड येथील रक्षक ग्रुप, व विविध ठिकाणी शिवप्रतिमांचे पूजन व प्रतिष्ठापना पार पडली.

मिरजेमध्ये महिला सहभागासह उत्सवी मिरवणूक

मिरज शहर व ग्रामीण भागात मंगळवारी शिवजयंतीचे औचित्य साधून सकाळपासून विविध उपक्रम राबविण्यात आले. शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ 108 महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सुधीर अवसरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख चौकांमध्ये भगवे ध्वज फडकत होते. संघटित हिंदू संघटना, रेल्वे प्रवासी सेना, शिवकल्याण समिती आदी संस्थांनी भव्य शिवजयंती साजरी केली.

रक्तदान शिबिरास प्रतिसाद

ब्राह्मणपुरी परिसरात शिवकल्याण मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 35 नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. हिंदू एकता आंदोलनाने हिंदमाता चौकात मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पाडला. आमदार सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भगवान परशुराम व छत्रपती शिवाजी महाराज यांना पूजनाद्वारे आदरांजली अर्पण करण्यात आली.