| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ एप्रिल २०२५
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदावर सत्यम गांधी या आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याआधी या पदावर कार्यरत असलेले आयुक्त शुभम गुप्ता यांची अचानक बदली होऊन ते नागपूरला गेले होते. त्यांच्या जागी प्रभारी आयुक्त म्हणून काही वरिष्ठ अधिकार्यांची नावे चर्चेत होती. मात्र, राज्य सरकारने थेट आयएएस अधिकाऱ्यालाच नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. सध्या सत्यम गांधी डहाणू (जि. पालघर) येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नियुक्तीमुळे सांगली महापालिकेच्या प्रशासनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शुभम गुप्ता यांच्या कार्यकाळात घरपट्टी वाढ, नागरिकांच्या तक्रारी आणि प्रशासनातील असमाधान यामुळे नाराजीचे वातावरण होते. त्यांच्या जागी प्रभारी पदासाठी अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख आणि रविकांत अडसूळ यांच्यात रस्सीखेच सुरू होती. अखेर वरिष्ठतेच्या निकषानुसार अडसूळ यांच्याकडे प्रभारीपद सोपवण्यात आले. या पदावर पदोन्नतीने येण्यास इच्छुक अनेक अधिकारी होते. मात्र, मोठ्या शहराच्या कारभारात गती आणण्यासाठी थेट IAS अधिकाऱ्याची गरज असल्याचे लक्षात घेऊन राज्य शासन व लोकप्रतिनिधींनी ही नियुक्ती केली आहे. सत्यम गांधी हे कार्यक्षम व प्रतिभावान अधिकारी म्हणून ओळखले जातात.
सत्यम गांधी यांचा थोडक्यात परिचय
बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सत्यम गांधी यांनी UPSC 2020 मध्ये देशात 10 वा क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. त्यांच्या वडिलांचे नाव अखिलेश सिंग असून ते सरकारी नोकरीत आहेत. त्यांच्या मातोश्री गृहिणी आहेत. सत्यम यांचा एक लहान भाऊ आहे जो शिक्षण घेत आहे. शालेय शिक्षण त्यांनी केंद्रीय विद्यालयात पूर्ण केले असून, दिल्ली विद्यापीठातील दयाल सिंग कॉलेजमधून त्यांनी राज्यशास्त्र विषयात बीए ऑनर्स पदवी घेतली आहे.