| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ एप्रिल २०२५
सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरू केलेला ‘माझ्या गावचा धडा’ हा अभिनव उपक्रम राज्यस्तरावर एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासातील संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने समजाव्यात, यासाठी स्थानिक संदर्भांचा वापर करून हे धडे तयार करण्यात आले आहेत. या उपक्रमाची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
स्थानिक इतिहासाचे धडे शालेय अभ्यासात
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शिक्षकांनी सुमारे ७०० गावांमधून तब्बल २,२६३ स्थानिक धडे लिहिले आहेत. या धड्यांमध्ये गावचा इतिहास, भूगोल, संस्कृती, परंपरा आणि विशेष व्यक्तींची माहिती समाविष्ट आहे. हे धडे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात शिकवले जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाशी, परिसराशी अधिक चांगली नाळ जोडता येईल, असा विश्वास धोडमिसे यांनी व्यक्त केला.
परिचित उदाहरणांमुळे संकल्पना अधिक स्पष्ट
सध्याच्या अभ्यासक्रमांमध्ये वापरली जाणारी उदाहरणे इतर जिल्ह्यांतील असल्याने ती मुलांना नेहमीच समजत नाहीत. मात्र, जर उदाहरणे त्यांच्या आसपासची असतील, तर त्या संकल्पना अधिक सहज समजतात. या दृष्टिकोनातून 'माझ्या गावचा धडा' उपक्रम मुलांच्या बौद्धिक विकासासाठी प्रभावी ठरत आहे. यामध्ये मंदिर, नद्या, डोंगर, तलाव, स्थानिक खेळ, पदार्थ, उत्सव, दागिने अशा अनेक स्थानिक घटकांचा अभ्यासाचा भाग करण्यात आला आहे.
शिक्षक झाले लेखक – स्थानिक साहित्याची निर्मिती
या उपक्रमामुळे शिक्षकांनी केवळ शिकवले नाही, तर कथा, कविता व वर्णनात्मक लेखनाच्या माध्यमातून स्थानिक साहित्य निर्मितीही केली. यामुळे एक आगळंवेगळं ज्ञानसंपन्न शैक्षणिक साहित्य तयार झालं आहे.
तालुक्यानुसार धड्यांची संख्या –
शिराळा: १४७
वाळवा: ८५
खानापूर: ८६
मिरज: १२७
जत (मराठी): २५६
जत (कन्नड): ११२
कडेगाव: ९६
पलूस: ६५
आटपाडी: ८७
कवठेमहांकाळ: ८०
तासगाव: १०२
शालेय पुस्तकांत स्थानिक धड्यांसाठी जागा हवी –
धोडमिसे यांनी सांगितले की, पुढील टप्प्यात राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थेला विनंती करण्यात येणार आहे की शालेय पुस्तकांत काही पानं स्थानिक धड्यांसाठी राखीव ठेवावीत. यामुळे शिक्षकांना स्थानिक उदाहरणांचा वापर करून शिकवता येईल आणि विद्यार्थ्यांनाही अभ्यास अधिक समजायला मदत होईल.