yuva MAharashtra फ्लॅटमध्ये राहणं होणार अधिक खर्चिक, सरकारचा नवा निर्णय फ्लॅटधारकांसाठी चिंता वाढवणारा !

फ्लॅटमध्ये राहणं होणार अधिक खर्चिक, सरकारचा नवा निर्णय फ्लॅटधारकांसाठी चिंता वाढवणारा !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १४ एप्रिल २०२५

फ्लॅटमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही गृहनिर्माण संस्थेला दरमहा ₹७,५०० पेक्षा जास्त देखभाल शुल्क भरत असाल, तर आता त्यावर अतिरिक्त खर्चाची तयारी ठेवा. कारण केंद्र सरकारने या देखभाल शुल्कावर १८% जीएसटी (GST) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन नियमांनुसार, जर एखाद्या गृहनिर्माण सोसायटीचा एकूण देखभाल खर्च दरमहा ₹७,५०० पेक्षा जास्त आणि वर्षभरात ₹२० लाखांपेक्षा जास्त असेल, तर त्या खर्चावर जीएसटी आकारला जाणार आहे. उदाहरणार्थ, तुम्ही दरमहा ₹९,००० भरत असाल आणि सोसायटीची वार्षिक उलाढाल ₹२० लाखांहून अधिक असेल, तर तुम्हाला आता दरमहा जवळपास ₹१,६२० अधिक म्हणजेच एकूण ₹१०,६२० भरावे लागतील.

एकापेक्षा जास्त फ्लॅट असल्यास काय ?

जर एखाद्या व्यक्तीकडे दोन किंवा अधिक फ्लॅट असतील आणि प्रत्येकावर ₹७,५०० देखभाल शुल्क देत असेल, तरी एकत्रित रक्कम ₹१५,००० झाली तरी प्रत्येक फ्लॅटवर स्वतंत्रपणे सूट मिळणार नाही. अशा वेळी संपूर्ण रकमेवर जीएसटी लागू होईल.


पूर्वी किती सूट होती ?

२०१८ मध्ये झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या २५व्या बैठकीत दरमहा ₹५,००० पर्यंतच्या देखभाल खर्चाला सूट मिळत होती, ती वाढवून ₹७,५०० करण्यात आली होती. मात्र आता त्याही पुढे जाऊन, खर्च वाढल्यास कर देखील वाढणार आहे.

तुमच्या सोसायटीवर नियम लागू होतोय का ?

जर तुम्हाला खात्री नसेल की हा नियम तुमच्या सोसायटीवर लागू होतो की नाही, तर तुम्ही स्थानिक व्यावसायिक कर कार्यालयात ₹५०० भरून तपासणी करू शकता.