| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० एप्रिल २०२५
सांगली जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या कारखान्यांमध्ये, विशेषतः सध्या बंद असलेल्या औद्योगिक यंत्रणांमध्ये, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक असल्याचे निर्देश अपर जिल्हादंडाधिकारी अजय पवार यांनी दिले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि जिल्हा उद्योग केंद्राने याबाबत कारखाना मालकांना मार्गदर्शन करावे, असे त्यांनी सूचित केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा अंमली पदार्थ विरोधी समितीची बैठक अपर जिल्हादंडाधिकारी पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पवार यांनी औषध प्रशासन विभागाला सांगलीतील ज्या मेडिकल स्टोअर्समध्ये अद्याप सीसीटीव्ही बसवले गेले नाहीत, त्यांना त्वरित ती सुविधा कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यास सांगितले. तसेच, जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयाच्या १०० ते २०० मीटर परिसरात सध्या किती पानटपऱ्या कार्यरत आहेत याची माहिती समितीला सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सांगली जिल्ह्यात व्यसनमुक्तीसाठी सुविधा निर्माण करण्याचा मुद्दा बैठकीत चर्चिला गेला. यावर बोलताना डॉ. विक्रमसिंह कदम यांनी सांगितले की, मिरज येथील सिव्हिल रुग्णालयात २० खाटांचे व्यसनमुक्ती केंद्र कार्यरत आहे आणि भविष्यात आणखी मोठे केंद्र स्थापन करण्याचे नियोजन सुरू आहे. या बैठकीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी आरटीओ कार्यालयाकडून तयार केलेले अंमली पदार्थ विरोधी स्टीकर दाखवले. तसेच, अंमली पदार्थांच्या प्रकरणात गुंतलेल्या वाहनचालकांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांची लागवड रोखण्यासाठी महसूल, वन व कृषी विभागांनी संयुक्तपणे तपासणी करावी आणि संशयास्पद माहिती पोलिसांना कळवावी, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले.