yuva MAharashtra मगरीचा थरारक हल्ला; जलतरणपटू स्वतःची धाडसी सुटका !

मगरीचा थरारक हल्ला; जलतरणपटू स्वतःची धाडसी सुटका !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ एप्रिल २०२५

सकाळच्या शांत वातावरणात कृष्णा नदीच्या माई घाटावर जलतरणाचा आनंद घेत असताना अचानक झालेल्या मगरीच्या हल्ल्यातून एका जलतरणपटूने प्रसंगावधान राखत आपला जीव वाचवला. शरद जाधव, कृष्णामाई जलतरण संस्थेचे नियमित जलतरणपटू, सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पोहण्यासाठी माई घाटावर गेले होते. मित्र नदीच्या काठावर असताना, जाधव मध्यभागी पोहत होते. तेवढ्यात अचानक नदीच्या पात्रातून एक मगर समोर आली आणि तिने त्यांच्या उजव्या पायाला आपल्या जबड्यात पकडले.

हा अनपेक्षित हल्ला होताच, त्यांनी घाबरून न जाता प्रसंगावधान राखले आणि डाव्या पायाने मगरीच्या तोंडावर जोरदार प्रहार केला. हा प्रतिकार इतका तीव्र होता की मगरीने पाय सोडून दिला आणि नदीत गायब झाली. त्यानंतर जाधव पोहत काठावर आले, जिथे त्यांच्या मित्रांनी त्यांना तात्काळ सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

उपचारादरम्यान त्यांच्या पायात मगरीचे दात घुसल्याने झालेल्या जखमेवर प्राथमिक उपचार झाले आणि दुपारी त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. मात्र पुढील काही दिवस त्यांना उपचारासाठी रुग्णालयात यावे लागणार आहे. या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


धाडस आणि प्रसंगावधान यांचा विजय

शरद जाधव यांनी आपल्या धैर्याने आणि अनुभवाच्या जोरावर मृत्यूच्या जबड्यातून सुटका केली. "काळ आला होता, पण वेळ आली नव्हती" याची प्रचिती या घटनेतून स्पष्टपणे दिसून आली.

मगरींची उपस्थिती आणि सतर्कतेचा इशारा

गेल्या काही वर्षांत कृष्णा नदीत मगरीच्या हल्ल्याच्या पाच-सहा घटना समोर आल्या आहेत. घाटावर सतत मगरींचे दर्शन होते असून, खबरदारीचा फलकही लावण्यात आला आहे. तसेच, मगरीपासून बचावासाठी उपायांची माहिती देखील दिली आहे. तरीही पोहणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

"मी सुदैवी ठरलो, पण अशा प्रसंगी इतरांनी काय करायचं? याचा विचार होणं आवश्यक आहे. शेकडो नागरिक येथे दररोज पोहायला येतात."
— शरद जाधव, जखमी जलतरणपटू


---