| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ एप्रिल २०२५
महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त करून त्यांना परत पाठविण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर राबवली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते माध्यमांशी संवाद साधत होते.
काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तेथील पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. याच उपक्रमाअंतर्गत, तिसरे विशेष विमान २३२ प्रवाशांसह आज मुंबई विमानतळावर उतरले. या वेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार उपस्थित होते. अकोला व अमरावती जिल्ह्यांतील प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी बसची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
आतापर्यंत सुमारे ८०० पर्यटक सुरक्षितपणे परत आले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, प्रत्येक पोलिस ठाण्याला पाकिस्तानी नागरिकांच्या यादीची माहिती देण्यात आली आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात ४८ तासांपेक्षा जास्त काळ थांबू नये, यासाठी काटेकोर लक्ष ठेवले जात आहे. या प्रक्रियेत नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काल दोन विशेष विमानांनी १८४ प्रवासी परत आणल्यानंतर, आज तिसऱ्या विशेष विमानाने आणखी २३२ प्रवासी महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. आतापर्यंत विशेष विमान आणि इतर माध्यमांतून मिळून सुमारे ८०० प्रवासी परत आले आहेत.
याशिवाय, ६० ते ७० पर्यटकांनी परतीसाठी विनंती केली असून, त्यांच्या प्रवासाचीही लवकरच व्यवस्था करण्यात येणार आहे. नव्या विनंत्यांनुसारही आवश्यक ती मदत देण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारने दिली.