yuva MAharashtra कुंडल येथील भ. पार्श्वनाथ जैन मूर्ती मोडतोड: अज्ञात समाजकंटकांवर तातडीने कारवाई करा, द. भा. जैन सभेची मागणी !

कुंडल येथील भ. पार्श्वनाथ जैन मूर्ती मोडतोड: अज्ञात समाजकंटकांवर तातडीने कारवाई करा, द. भा. जैन सभेची मागणी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ एप्रिल २०२५

कुंडल येथील श्री १००८ गिरी पार्श्वनाथ दिगंबर जैन सिद्धातिशय क्षेत्रावरील जैन मंदिरात अज्ञात समाजकंटकांनी शनिवारी केलेल्या भ. पार्श्वनाथ व अन्य मूर्तींच्या केलेल्या मोडतोडीचा धक्का देणारा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने जैन समुदायात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

त्यामुळे आमच्या जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. दक्षिण भारत जैन सभा याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे. तातडीने समाजकंटक आरोपीचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. 

कुंडल येथील क्षेत्रावर भ. पार्श्वनाथ व भ. महावीर यांची समवशरणे झाली असून या क्षेत्रावरुन अंतीम केवली श्रीधर स्वामी मोक्षास गेले आहेत. या क्षेत्राच्या दर्शनासाठी देशभरातून जैन भाविक येत असतात. आमच्या धार्मिक भावनांचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा होणे व यापुढे अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, याची पोलीस प्रशासनाने दखल घेणे आवश्यक आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.


कुंडल येथील जैन मंदिरातील मूर्तींची मोडतोड ही केवळ धार्मिक विश्वासाचीच धिंड काढत नाही, तर ती संपूर्ण जैन व बहुजन समाजाच्या शांततेला धक्का देणारी आहे असे अध्यक्ष भालचंद्र पाटील म्हणाले. 

याप्रकरणी दक्षिण भारत जैन सभा व मंदीर कमिटीच्या मागणीनुसार स्थानिक पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. आम्ही या प्रकरणात दोषींना लवकरात लवकर पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. कोणतीही गडबड सहन केली जाणार नाही.”असे निवेदन स्विकारताना अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर म्हणाल्या. 

 धार्मिक स्थळांवरील हल्ले समाजातील एकता आणि सामंजस्याला हानिकारक ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर, जैन मंदिरांचे संरक्षण करण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे भालचंद्र पाटील माध्यमाशी बोलताना म्हणाले
 यावेळी चेअरमन रावसाहेब पाटील यांनी सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या अशा घटना घडू नयेत. यासाठी तातडीने कायदेशीर कारवाई करावी असे सांगितले. 

निवेदन देताना शिष्टमंडळात सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, महामंत्री प्रा. एन.डी.बिरनाळे, सौ. स्वरुपा यड्रावकर,अंजली कोले, अनिता पाटील, छाया कुंभोजकर , सुरेखा मुंजाप्पा, सुनिता चौगुले ,मंगल चव्हाण, सचिन पाटील, अजितकुमार बिरनाळे आदि सहभागी झाले होते.