yuva MAharashtra खासदारांच्या हस्तक्षेपामुळे तासगावचे विश्रामगृह अखेर खुले; अभिनेते भरत जाधव यांना मिळाली निवासाची सोय !

खासदारांच्या हस्तक्षेपामुळे तासगावचे विश्रामगृह अखेर खुले; अभिनेते भरत जाधव यांना मिळाली निवासाची सोय !


| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - दि. १९ एप्रिल २०२५

तासगाव शहरातील बांधकाम विभागाचे विश्रामगृह तब्बल पंधरा दिवसांपासून बंद होते. मात्र, शुक्रवारी खासदार विशाल पाटील यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केल्यानंतर केवळ एका तासातच विश्रामगृह उघडण्यात आले. यामुळे ज्येष्ठ सिने व नाट्य अभिनेते भरत जाधव यांच्यासाठी निवासाची सोय करण्यात आली.

बांधकाम विभागाच्या एका कर्मचाऱ्यावर संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी असल्यामुळे विश्रामगृह सुरू ठेवणे कठीण झाल्याचे कारण पुढे आले होते. परिणामी, अनेक मान्यवर व्यक्तींना या सुविधेपासून वंचित राहावे लागत होते.

भरत जाधव यांचा नाट्यप्रयोग 18 एप्रिल रोजी तासगाव येथे आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यासाठी विश्रामगृह उपलब्ध व्हावे, यासाठी आयोजकांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, विश्रामगृह बंद असल्याने अडचणी निर्माण झाल्या. या समस्येची माहिती मिळाल्यावर आमदार रोहित पाटील यांनी हस्तक्षेप करत नाटकाच्या तारखेपूर्वी निवास उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.


शुक्रवारी नाटकाच्या दिवशी भरत जाधव यांच्या टीमची वाहने तासगावकडे रवाना झाली, तरीही विश्रामगृह बंदच होते. ही बाब वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमित पाटील यांच्या माध्यमातून खासदार विशाल पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. त्यानंतर त्यांनी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तातडीने कारवाई करण्यास सांगितले. या हस्तक्षेपानंतर लगेचच विश्रामगृह उघडण्यात आले आणि आयोजकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.