| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ एप्रिल २०२५
स्वर्गीय माजी मंत्री डॉ. पतंगरावजी कदम यांची कन्या व माजी मंत्री आ. विश्वजित कदम यांच्या लाडक्या भगिनी, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांची पत्नी सौ. भारतीताई लाड यांचे सोमवार दि.२८ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते, तसेच अनेकांना अश्रू अनावर झाले.
माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांनी कन्येच्या नावाने अनेक संस्था उभ्या केल्या. अशा या भारतीताई लाड यांचा जन्म १८ जुलै १९७२ रोजी सोनसळ (ता. कडेगाव) येथे झाला.
आज भारती संकुल डौलाने विद्यादानाचे अविरत काम करत आहे. घरात राजकिय वातावरण असले तरी ही भारतीताईचे राहणीमान अतिशय साध्या पद्धतीचे होते. तसेच त्यांनी सगळ्यांना बहिणीची माया दिली. सामान्यातील सामान्य व्यक्तीना जीवापाड जीव लावला.
लग्नापूर्वी घरातल्यांनी भारतीताईंना लग्नाबद्दल विचारले असता त्यांनी त्यावेळी सांगितले की, मला चुलीला जाळ घालावा लागला तरी चालेल पण मी महेंद्र लाड यांच्याशीच लग्न करेन. असे सांगितल्यानंतर त्यांचे लग्न कुंडल येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक महेंद्र लाड यांच्याशी ३ मे १९९५ रोजी झाले. जवळच्या पाहण्यांच्यात लग्न झाल्यामुळे त्या येथे रूळल्या होत्या.
त्यांच्या प्रयत्नांतून भारती शुगर, डॉ. पतंगराव कदम विद्यालय अशा विविध संस्थाचे जाळे परिसरात उभे केले. भारतीताईनी महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उभे करून देण्यासाठी प्रयत्न केले. महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्या नेहमी तत्पर असत. महेंद्र लाड यांच्यावरती जिल्हा बँक व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ही पदे असल्याने भारतीताई गावगाडा व महिला सबलीकरण यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशिल असत. भारतीताई व महेंद्र लाड यांना दोन मुले असून मोठा मुलगा ऋषिकेश उद्योग व्यवसाय बघतो. व रोहन हा राजकारण व समाजकारणात वडिलांना हातभार लावत आहे.
भारतीताईंना १४ एप्रिल रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. नंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांना पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर शर्तीचे उपचार केले. परंतु सोमवार दि. २८ एप्रिल रोजी त्यांच्यावरती काळाने घाला घातला आणि अखेर त्यांची प्राणज्योत मावळली.