| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ एप्रिल २०२५
वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची रचना व आर्थिक तरतुदीबाबत कार्यवाही सुरू असून लवकरच राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठीचे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ कार्यरत करू असे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले.
वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे मार्गदर्शक, ठाणे येथील आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री श्री फुंडकर यांची मुंबईत भेट घेतली, त्यावेळी श्री फुंडकर यांनी हे आश्वासन दिले. या शिष्ठमंडळात राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर वर्धा, कार्याध्यक्ष बालाजी पवार नांदेड, सरचिटणीस विकास सूर्यवंशी सांगली, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार बुलढाणा व व्यवस्थापन समिती सदस्य दत्तात्रय घाडगे ठाणे यांचा सहभाग होता.
वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मागील सरकारच्या काळात मंत्रिमंडळ बैठकीत स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र अद्याप पुढील कारवाई झालेली नाही. याबाबत राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाने श्री केळकर यांच्या समवेत कामगार मंत्री श्री फुंडकर यांची भेट घेतली.
वृत्तपत्र विक्रेता हा दुर्लक्षित घटक असून अनेक अडचणींवर मात करत व्यवसाय करत आहे. सध्या वृत्तपत्र व्यवसायातील अडचणी बरोबरच या वृत्तपत्र विक्रेत्यांनाही लढावे लागत आहे. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठीचे कल्याणकारी मंडळ लवकरात लवकर कार्यरत करावे. या मंडळासाठी लागणारा निधी उभा करण्याचे मार्ग राज्य शासनाने नेमलेल्या अभ्यास समितीने सुचवलेले आहेत. २०१९ मध्ये या अभ्यास समितीने आपला अहवाल राज्य शासनास दिला असून त्यातील सुचवलेल्या मार्गापैकी काही मार्गांचा अवलंब करून निधीचा स्त्रोत नक्की करावा.
त्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी पेन्शन, व्यवसायासाठी मदत, व्यवसायासाठी साधनसामग्रीचा पुरवठा, आरोग्य सुविधा, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी योजना आदी योजना लागू कराव्यात अशी विनंती आमदार श्री केळकर यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्यावतीने कामगार मंत्र्यांना केली. राज्य संघटनेचे अध्यक्ष श्री पाटणकर, कार्याध्यक्ष श्री पवार, सरचिटणीस श्री. विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष श्री टिकार व सदस्य श्री घाडगे यांनीही यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.
कामगार मंत्री श्री फुंडकर यांनी यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या व्यवसाय एकूण कामाची पद्धत याबाबत सविस्तर चर्चा केली. इतर महामंडळाबाबतच्या येत असणाऱ्या अडचणी व त्याचा विचार करून वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी असणाऱ्या स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची रचना याबाबत काम सुरू असल्याचे सांगितले. लवकरच वृत्तपत्र विक्रेत्यांचे कल्याणकारी मंडळ कार्यरत होईल असे आश्वासन दिले.