yuva MAharashtra पंढरीची वारी लंडनच्या दारी; भक्त अनिल खेडकर यांचा अनोखा उपक्रम !

पंढरीची वारी लंडनच्या दारी; भक्त अनिल खेडकर यांचा अनोखा उपक्रम !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ एप्रिल २०२५

मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील, सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेले विठ्ठलभक्त अनिल एकनाथ खेडकर यांनी एक अनोखी आध्यात्मिक मोहिम हाती घेतली आहे. त्यांनी युकेच्या लंडन शहरात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प केला असून, त्याच्या निमित्ताने पंढरपूर ते लंडन अशी पादुकांच्या आंतरराष्ट्रीय वारीची सुरुवात झाली आहे.

१४ एप्रिल रोजी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पादुकांची विधिवत पूजा मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पार पडली. यानंतर ही पवित्र पादुका लंडनच्या दिशेने प्रस्थान ठेवण्यात आल्या. या ऐतिहासिक क्षणी मंदिर समितीचे पदाधिकारी, भाविक व स्वयंसेवक उपस्थित होते.

पंढरपूरची वारी आंतरराष्ट्रीय पातळीवर

अनिल खेडकर यांनी सांगितले की, “गेल्या सात वर्षांपासून मी आळंदी ते पंढरपूर अशी पारंपरिक पायी वारी करतो. जगभरात अनेक भारतीय मंदिरे आहेत, मात्र पंढरपूरच्या विठोबाच्या भक्तीचा जागतिक विस्तार होणे आवश्यक आहे. त्यामुळेच वारीसह विठ्ठल मंदिर लंडनमध्ये साकारण्याचा संकल्प केला.”

या दिंडीत २२ देशांमधून प्रवास करत सुमारे १८,००० किलोमीटर अंतर कारने पार करण्यात येणार आहे. भारतातून १८ एप्रिलला निघून, नेपाळ, चीन, रशिया, जर्मनी आदी देशांतून प्रवास करत ही दिंडी लंडनमध्ये पोहोचेल. हा संपूर्ण प्रवास ७० दिवसांत पूर्ण केला जाणार आहे. यासाठी आवश्यक व्हिसा, वाहन परवाने व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत.


एक भक्तीमय संदेश जगभरासाठी

खेडकर यांनी स्पष्ट केले की, “वारी म्हणजे केवळ चालणे नव्हे, ती एक भक्तीची अनुभूती, प्रेम, सामंजस्य आणि आत्मसमर्पण आहे. ती भावना सातासमुद्रापार पोहोचवण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे.”

या उपक्रमाच्या निमित्ताने पंढरपूरची वारी आणि संतपरंपरेचा वारसा आता जागतिक पातळीवर पोहोचणार आहे. यामुळे भक्ती आणि सांस्कृतिक एकात्मतेचा हा दीप लंडनमध्ये उजळणार आहे.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर

या दिवशी मंदिर समितीच्या शकुंतलाताई नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखाधिकारी मुकेश अनेचा, विभागप्रमुख पांडुरंग बुरांडे आणि खुद्द अनिल खेडकर उपस्थित होते.