yuva MAharashtra भिडे गुरुजींना कुत्र्याने चावा घेतला अन् सांगलीत डॉग व्हॅन धावू लागली... पण ?

भिडे गुरुजींना कुत्र्याने चावा घेतला अन् सांगलीत डॉग व्हॅन धावू लागली... पण ?

फोटो सौजन्य  : thehinduimages.com

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ एप्रिल २०२५

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर सांगली शहरातील माळी गल्ली येथे एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर महापालिकेने तत्काळ त्या परिसरात भटकी कुत्री पकडण्याची मोहीम राबवली. डॉग व्हॅनच्या मदतीने संबंधित भागातील कुत्री ताब्यात घेण्यात आली. यानिमित्ताने सांगली, मिरज आणि कुपवाड या त्रिशहरी भागातील भटक्या कुत्र्यांची समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च 2025 या तीन महिन्यांत 961 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षभरात एकूण 4,044 जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेकडून दरवर्षी नसबंदी व लसीकरण मोहीम राबवली जाते. 1 एप्रिल 2024 पासून 29 मार्च 2025 पर्यंत 1,380 कुत्र्यांवर नसबंदी आणि अँटी रेबीज लसीकरण करण्यात आले आहे. तरीही कुत्र्यांची वाढती संख्या आणि हल्ल्यांच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.


2016 मध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रश्न गांभीर्याने हाताळण्यात आला होता. त्यानंतर केलेल्या सर्वेक्षणात शहरात सुमारे 14 हजार मोकाट कुत्री असल्याचे समोर आले होते. सध्याची संख्या 22 ते 25 हजारांच्या आसपास असावी, असा महापालिकेचा अंदाज आहे. नागरिकांचा आक्षेप असा आहे की, केवळ एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीवर हल्ला झाल्यानंतरच महापालिका जागी होते. मात्र, सामान्य नागरिक आणि शालेय मुलांवर होणाऱ्या हल्ल्यांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे ही समस्या मुळापासून सोडवण्याची गरज आता निर्माण झाली आहे.