yuva MAharashtra कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध आणि निवारण कायद्याविषयी सांगलीत कायदेविषयक शिबिराचे आयोजन !

कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध आणि निवारण कायद्याविषयी सांगलीत कायदेविषयक शिबिराचे आयोजन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जानेवारी २०२५

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसार गुरुवारी, २३ जानेवारी २०२५ रोजी भारती हॉस्पिटल, सांगली येथे महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कायदेशीर जागरूकता शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध व निवारण कायदा (POSH Act) या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगलीचे सचिव मा. श्री. गि. ग. कांबळे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. पूजा नरवाडकर, प्राचार्या, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, सांगली यांनी POSH कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण कसे मिळावे यावर भर दिला. महिलांनी निर्भयपणे काम करावे, अन्याय सहन न करता विशाखा समितीकडे तक्रार दाखल करावी, असे त्यांनी आवाहन केले.


डॉ. नरवाडकर यांनी POSH कायद्याची माहिती देताना विशाखा समितीच्या कार्यपद्धती आणि जबाबदाऱ्या यांचे स्पष्टीकरण केले. तक्रार फक्त अन्याय झाल्यासच करावी आणि महिलांनी आपल्या अधिकारांसाठी उभे राहावे, असा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री. गि. ग. कांबळे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य आणि त्याद्वारे मिळणाऱ्या मोफत कायदेशीर सेवांविषयी माहिती दिली. गरजूंनी प्राधिकरणाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्वेता कुलकर्णी यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. अजित जोशी, वैद्यकीय अधीक्षक यांनी सादर केले. नितीन मुदीराज, अधिष्ठाता, भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या शिबिराला कर्मचारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांच्या सुरक्षेसाठी POSH कायद्याचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक झाले.

बातमी व फोटो सौजन्य - अभिजीत शिंदे