| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. २६ जानेवारी २०२५
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी 'महाराष्ट्र रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम' राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जलसंपदा विभागाकडून नियुक्त सल्लागार संस्थेला सर्वेक्षणाच्या कामांची अचूकता राखण्याच्या सूचनाही जागतिक बँक आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत.
प्रकल्प अंतर्गत पंचगंगा व कृष्णा नद्यांवरील महापूर नियंत्रणासाठी तसेच भूस्खलनाच्या सौम्यकरणासाठी उपाययोजना करण्यात येतील. यासाठी २,३३८ कोटी रुपयांचा निधी जागतिक बँकेने दिला आहे. यानुसार, २३ आणि २४ जानेवारी रोजी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांची पाहणी केली गेली.
पहाणी दरम्यान जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभाग आणि अन्य संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जागतिक बँकेचे पथक आणि स्थानिक अधिकारी यांनी विविध उपाययोजना आणि नियोजनाविषयी चर्चा केली.
सल्लागार कंपनीचे संचालक विनय कुलकर्णी यांनी सांगितले की, पूर नियंत्रणासाठी एक ठोस कृती आराखडा तयार केला जाईल. त्यांनी पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले की, कृष्णा नदीच्या उपनद्यांचे सर्वेक्षण करून भूस्खलन कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. यासोबतच पूर पूर्वानुमान यंत्रणा सशक्त करण्यात येईल.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वेक्षण सुरू होईल आणि पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या प्रकल्पांतर्गत नदी खोलीकरण आणि रुंदीकरण देखील केले जाईल. शेतकऱ्यांच्या सहभागाने याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी संवाद साधला जाईल.
जागतिक बँकेच्या पथकाने राधानगरी धरण, पंचगंगा व कृष्णा नदीचे पूरप्रवण क्षेत्र तसेच रंकाळा, कळंबा तलाव व शेंडा पार्क परिसराची पाहणी केली.