| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. २६ जानेवारी २०२५
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना त्यांच्या उल्लेखनीय आणि प्रभावी सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. आपल्या पोलीस सेवेमध्ये त्यांनी अनेक ठिकाणी अत्युत्कृष्ट कार्य करून समाजाला योगदान दिले आहे.
नक्षलप्रभावित भागातील प्रभावी कामगिरी
गडचिरोली आणि चंद्रपूर या नक्षलवाद प्रभावित भागात त्यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. नागपूर शहरात त्यांनी मोका (MCOCA) आणि एमपीडीए (MPDA) कायद्याची अंमलबजावणी करत गंभीर गुन्ह्यांमध्ये घट घडवली.
कोरोना महामारीत सेवाभाव
2020 मध्ये कोरोना महामारीदरम्यान, कठोर कायद्याची अंमलबजावणी करतानाच मानवतेची सेवा केली. त्यांनी समाजात शांतता राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवल्या. जातीय संघर्ष, मराठा आरक्षण आंदोलन आणि इतर तणावपूर्ण परिस्थिती हाताळताना त्यांनी सामाजिक सलोखा राखण्यावर भर दिला.
दंगल व्यवस्थापनातील कौशल्य
विशाळगड, पुसेसावळी, औंध अशा ठिकाणी दंगलसदृश्य परिस्थितीमध्ये त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून शांतता प्रस्थापित केली. त्यांच्या कौशल्यपूर्ण नेतृत्वामुळे कोल्हापूर, मिरज, कराड, औंध अशा भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात यश आले.
निवडणुकांदरम्यान शांततेचा पाळला धागा
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करून निवडणूक प्रक्रियेला शांततेत पार पाडण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. कर्नाटक सीमावर्ती भागांमध्ये समन्वय साधून कोणतीही अनुचित घटना होणार नाही, याची दक्षता घेतली.
वन्यजीव गुन्ह्यांवरील कारवाई
आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचा छडा लावत त्यांनी सुमारे 45 कोटींचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्या या यशस्वी कारवाईने गुन्हेगारांवर वचक निर्माण केला.
आधुनिक पोलीसींगचा अवलंब
संपत्तीविरोधी गुन्हे, सायबर गुन्हे आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी त्यांनी आधुनिक उपाययोजना केल्या. पुण्यात सायबर लॅब स्थापन करून सायबर सुरक्षेला चालना दिली.
पोलीस कल्याण आणि प्रशिक्षण
पोलीस अकादमीतील अधिकाऱ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देणे, मानसिक ताण-तणाव हाताळण्याचे उपाय, तसेच पोलीस दलाच्या कल्याणासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
पोलीस ठाण्यांचा गौरव
त्यांच्या कार्यकाळात कोल्हापूर परिक्षेत्रातील इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि शिरोळ पोलीस ठाणे 2024 साठी सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांचा किताब मिळवण्यात यशस्वी ठरले.
निष्कलंक कर्तव्यनिष्ठ अधिकारी
श्री. फुलारी यांची पोलीस सेवा निष्कलंक, कर्तव्यनिष्ठ, आणि गुणवत्तापूर्ण राहिली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याने पोलीस विभागात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. त्यांचे योगदान इतरांसाठी प्रेरणादायक ठरत असून, त्यांच्या कार्याने पोलीस सेवेची एक नवी उंची गाठली आहे.