| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जानेवारी २०२५
सोनं हे स्त्रीसाठी केवळ धातू नसून तिच्या सौंदर्याचं तेज आहे. ते तिच्या अस्तित्वाचं प्रतीक आहे; तिच्या पारंपरिक वारशाला जोडणारा दुवा आहे. सोन्याचे दागिने तिच्या व्यक्तिमत्त्वाला एका विशिष्ट छटेत रंगवतात, जिथे सौंदर्य, साजश्रृंगार, आणि सांस्कृतिक गर्वाची अभिव्यक्ती एकत्र येते. सोनं म्हणजे तिच्या आयुष्यातील आठवणींचं दालन आहे - कधी आईच्या कुशीतून आलेला हार, तर कधी नव्या प्रवासाची सुरुवात म्हणून मिळालेली अंगठी. दागिने हे तिच्या स्वप्नांना आकार देणारे अनमोल क्षणांचे साक्षीदार आहेत. त्याचं महत्त्व सौंदर्याच्या पलीकडेही आहे - सोनं तिच्या कष्टाचा सन्मान आहे, सुरक्षिततेचं आश्वासन आहे, आणि तिच्या आत्मविश्वासाचं प्रतिबिंब आहे. ते तिच्या आयुष्याच्या वळणावर आशा आणि शक्तीचं प्रतीक बनतं.
प्रत्येक नक्षी, प्रत्येक चमकणारा कण, जणू तिच्या कथा सांगतो; कधी तिच्या सणांच्या आठवणींशी जोडतो, तर कधी तिच्या स्वप्नांना साकार करताना तिच्यासोबत उभा राहतो. स्त्री आणि सोनं यांचा संबंध म्हणजे जिथे कलात्मकता आणि भावना एकत्र येतात, जिथे परंपरा आणि आधुनिकता हातात हात घालतात, आणि जिथे सौंदर्याला अर्थ प्राप्त होतो. इतकंच नाही, तर अडचणीच्या काळात आर्थिक मदतीसाठीचा तो एक हक्काचा स्रोत बनतो. दागिने गहाण ठेवून किंवा प्रसंगी ते विकून आयुष्यात आलेल्या अडचणीच्या प्रसंगातून ती स्त्री या कुटुंबाला बाहेर काढते. दागिने काय, पुन्हा करता येतील... पण माझ्या कुटुंबाला या अडचणीच्या प्रसंगातून बाहेर काढणे ही माझी प्राथमिकता आहे असा उच्च विचार एखादी स्त्रीच करू शकते...
हे सारं थोडं विस्तृत सांगण्याचा कारण म्हणजे, एखाद्या दुकानात गेल्यानंतर सर्व प्रकारचे दागिने एकाच ठिकाणी आपल्याला मिळतात... पण ज्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येक आजारासाठी वेगवेगळे स्पेशलायझेशन असलेले डॉक्टर आपल्याला पहावयास मिळतात... तसेच ते सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारागिरीमध्येही असतात... एखादा कारागीर एका विशिष्ट दागिन्यासाठी प्रसिद्ध असतो...असाच एक कारागीर... ठुशीचे आणि पोकळ दागिने घडविणारा एकलव्य... होय, एकलव्यच... आणि या एकलव्याचे नाव आहे, किशोर सखाराम भाटकर... वडिलांच्या व्यवसायात, पाहून पाहूनच त्याने दागिने बनवण्याचे शिक्षण घेतले. पण एवढ्यावरच न थांबता, नेहमी नाविन्याची ओढ असलेल्या किशोरच्या लक्षात आले की सांगलीत ठुशी बनविणारे कारागीर नाहीत... ही ठुशी शिकण्यासाठी त्याने सांगलीत प्रयत्न केला. पण येथे त्याची डाळ शिजली नाही... कोल्हापूर हे ठुशी बनवण्याचे माहेरघर.. तेव्हा त्याने कोल्हापूर गाठले आणि कोल्हापूर येथील कारागिरांकडे पाहून, पाहून ठुशी बनविण्याची कला हस्तगत केली... कारण एखादा सोनार किंवा कारागीर आपली कला सहजासहजी दुसऱ्याला देत नाही... त्यामुळे किशोरने कोल्हापूर येथे ठुशीचे दागिने बनवणाऱ्या सोनाराकडे जाऊन बसल्यानंतर, आपण सोनार आहे हे त्याने सांगितले नव्हते... वास्तविकरित्या हे नैतिकतेला धरून नाही हे मान्य... पण असे म्हणतात, 'जर तूप सरळ बोटाने निघत नसेल, तर बोट वाकडे करावे लागते.' त्यामुळे किशोरने थोडे वाकड्यात शिरून ही कला हस्तगत केली...
(अर्थात मला याचे समर्थन करायचे नाही...)
किशोर हा सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारागिरीतील तिसरी पिढी... सोन्याचे दागिने विक्रीमधील सांगलीतील सुप्रसिद्ध फर्म पीएनजी अर्थात पुरुषोत्तम नारायण गाडगीळ... या फॉर्मसाठी दागिने बनवून देणारे कारागीर म्हणूनही... किशोरचे पूर्वज कोकणातील... पण तुटपुंज्या उत्पन्नावर कुटुंबाचा भागायचं नाही म्हणून गोविंद भाटकर (किशोरचे आजोबा) यांनी आपली मुले सांगलीला मेहुण्यांच्याकडे (रघुनाथ बेलवलकर) यांच्याकडे पाठवली. मग येथे आल्यानंतर कोणी मोटरसायकल मेकॅनिक बनले, कोणी टेलर बनले... यातीलच सखाराम भाटकर हे एक त्यांचे चिरंजीव... त्यांनी आपल्या मामांकडून सोन्याचे दागिने बनवण्याची कला शिकून घेतली... सुरुवातीला मामाच्या हाताखालीच काम सुरू केले... पण दोनाचे चार हात झाल्यानंतर, मामावर ओझे नको म्हणून आणि स्वतंत्र संसार थाटला आणि स्वतंत्र व्यवसायही सुरू केला...
त्यांचा मुलगा, आपला एकलव्य... किशोर... हा लहानपणापासून हरहुन्नरी... पण शाळेपेक्षा तो रमला आपल्या पारंपारिक कारागिरीच्या व्यवसायात... पाचवीपासूनच किशोर शाळेच्या वेळे व्यतिरिक्त वडिलांच्या हाताखाली छोटी मोठी कामे करायचा... दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर किशोरने वडिलांच्या व्यवसायात पूर्णपणे लक्ष घातले... बाजारात एखादा नवा दागिना आला, की तो दागिना बनविण्यासाठी किशोरची उत्सुकता जागी होते, आणि जोपर्यंत तो दागिना बनवित नाही, तोपर्यंत किशोरला चैन पडत नाही...
कोल्हापुरी ठुशी आणि पोकळ दागिने यामध्ये वैद्यकीय भाषेत सांगायचे तर किशोरचे स्पेसिलायझेशन... ठुशी किंवा पोकळ दागिने बनवायचे तर, त्यासाठी अंगी कसब लागते... दिलेल्या वजना इतकाच दागिना झाला पाहिजे... ना कमी, ना जादा... या पोकळ दागिण्यावर नक्षीकाम करायचे हे तर खूपच अवघड... कधीकधी हा दागिना बनविताना तुटतो... मग यामध्ये नुकसान ही सोसावे लागते...
हे झाले व्यवसायाच्या बाबतीत...
किशोरला पक्ष्यांची खूप आवड... गावभागात त्याचे एकत्र कुटुंबातील मोठे घर... तेथे त्याने 200 विविध प्रकारच्या चिमण्यांचे संगोपन केले होते... पण पण या चिमण्या जशा मांजरांच्या खाद्य बनू लागल्या, तसे किशोरने या चिमण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देणे पसंत केले...
किशोरला पोहण्याचा छंद... मग पोहण्यासाठी शेजारी असलेली आपली कृष्णामाई... हा छंद जोपासण्यासाठी सकाळी सकाळी कृष्णा नदीवर जायचं... एकदा नदीवर पोहण्यासाठी गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, एक आजोबा दररोज पक्षांना खाऊ घालताहेत... तो आवडीने हे पाहायचा... ते आजोबा कृष्णा नदीच्या काठावर आले, की त्यांच्या अवतीभवती आपोआपच पक्षांचा थवा जमायचा... जणू दोघांनाही एकमेकांची ओढ लागल्याप्रमाणे... पण एक दिवस आजोबा कृष्णा नदीवर येण्याचे बंद झाले... कदाचित....
पण ते ज्यांना खायला घालायचे, ते पक्षी मात्र आजोबा खायला घालायच्या वेळेत कृष्णा नदीच्या काठावर यायचे.... आपला अन्नदाता आला नाही हे पाहून ते त्यांना सादही घालायचे... पण या पक्षांची साद ऐकण्याच्या पलीकडे आजोबा गेले असावेत... तेव्हा किशोरने या आजोबांची जागा घेतली... आणि दररोज सकाळी सातच्या सुमारास किशोर पिशवीत विविध प्रकारचे धान्य घेऊन कृष्णा नदीकाठी यायचा... आपले नेहमीचे मित्र आजोबां ऐवजी कोणीतरी दुसराच तरुण आपल्यासाठी धान्य घेऊन येतोय, हे त्या पक्षांना दिसत होते... पण ते किशोरच्या जवळ यायला बुजायचे... तेव्हा किशोरने जमिनीवर धान्य ठेवून बाजूला जाऊन उभे राहण्यास सुरुवात केली...
आणि थोड्या दिवसात किशोरची आणि या पक्षांचीही मैत्री जमली... त्या आजोबांप्रमाणेच किशोर आजही आपले मैत्रीचे नाते प्रामाणिकपणे जपतोय... निसर्गात या पक्षांना जरी खायला मिळत असले, तरी आपल्या मित्राच्या हातचे खाण्यासाठी ते दररोज सकाळी ठराविक वेळी कृष्णा नदीच्या काठावर येत असतात... असा हा आमचा पक्षी मित्र... सोन्याचे दागिने बनविणारा एकलव्य...
किशोरची माहिती पाहिल्यानंतर आता सोन्याचे दागिने किती प्रकारच्या असतात हे पाहू !...
1. मंगळसूत्राचे प्रकार
चंद्रहार, कसु मंगळसूत्र, पेंडंट मंगळसूत्र, वती मंगळसूत्र, नक्षीदार मंगळसूत्र
2. हारांचे प्रकार
लक्ष्मी हार, ठुशी हार, कोल्हापुरी साज, गजरामाळ, मोतीहार
3. कानातल्यांचे प्रकार
झुमके, बोरमाळ, बाल्या, बुगडी, टॉप्स, रिंगी.
4. बांगड्यांचे प्रकार
सोन्याच्या पट्ट्या, कंकण, गजरेदार बांगड्या, कोरल बांगड्या, नक्षीदार बांगड्या,
5. अंगठ्यांचे प्रकार
सोलिटेअर अंगठी, नक्षी अंगठी, फ्लॉवर डिझाइन अंगठी, बॅंड स्टाईल अंगठी
6. पोत/गळ्यातील प्रकार
राणी हार पोत, नाजूक पोत, नक्षीदार पोत, पिंजऱ्याची पोत
7. पायातील दागिने
सोन्याचे पैंजण, जोडवी, टोऱ्या, तोडे.
8. कमरपट्ट्याचे प्रकार
नक्षीदार कमरपट्टा, साधा कमरपट्टा, मोत्यांनी सजलेला कमरपट्टा.
9. लटकन/पेंडंटचे प्रकार
गोंडस पेंडंट, नक्षीदार पेंडंट, फुलाच्या आकाराचा पेंडंट, हृदयाकृती पेंडंट
बरे इतकच नाही हं... एखाद्या क्षेत्रात जशी स्पेशलायझेशन असते, तसेच ते दागिन्यांमध्ये हे असते...
सोन्याच्या दागिन्यांचे विशिष्ट प्रकार दिले आहेत. हे प्रत्येक दागिन्याच्या वेगवेगळ्या डिझाइन आणि प्रकारांवर आधारित आहेत:
1. मंगळसूत्राचे प्रकार
चंद्रहार, कसु मंगळसूत्र, पेंडंट मंगळसूत्र, वती मंगळसूत्र, नक्षीदार मंगळसूत्र
2. हाराचे प्रकार
लक्ष्मी हार, ठुशी हार, कोल्हापुरी साज, गजरामाळ, मोतीहार
3. कानातल्यांचे प्रकार
झुमके, बोरमाळी, बाल्या, बुगडी, टॉप्स, रिंगी.
4. बांगड्यांचे प्रकार
सोन्याच्या पट्ट्या, कंकण, गजरेदार बांगड्या, कोरल बांगड्या, नक्षीदार बांगड्या
5. अंगठ्यांचे प्रकार
सोलिटेअर अंगठी, नक्षी अंगठी, फ्लॉवर डिझाइन अंगठी, बॅंड स्टाईल अंगठी.
6. पोत/गळ्यातील प्रकार
राणी हार पोत, नाजूक पोत, नक्षीदार पोत, पिंजऱ्याची पोत.
7. पायातील दागिने
सोन्याचे पैंजण, जोडवी, टोऱ्या, तोडे.
8. कमरपट्ट्याचे प्रकार
नक्षीदार कमरपट्टा, साधा कमरपट्टा, मोत्यांनी सजलेला कमरपट्टा.
9. लटकन/पेंडंटचे प्रकार
गोंडस पेंडंट, नक्षीदार पेंडंट, फुलाच्या आकाराचा पेंडंट, हृदयाकृती पेंडंट.
तर असा हा आमचा आगळावेगळा एकमेवाद्वितीय सुवर्ण कारागीर आणि त्याचा हा आगळ्यावेगळा छंद !
शब्दांकन - रमेश नेमिनाथ सरडे
संपादक, सांगली समाचार वेबपोर्टल.