| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ जानेवारी २०२५
सगळं घडून गेल्यावर पोलिस पोहोचतात, असा साधारण अनुभव आहे. त्याला पोलिस दलाने आता अत्याधुनिक यंत्रणांच्या मदतीने छेद देण्यास सुरुवात केली आहे. शहरात कुठंही काहीही घडलं, तर ११२ नंबर डायल करतात. अवघ्या साडेतीन मिनिटांत पोलिस गाडी घटनास्थळी पोहोचते. तक्रारीचं निरसन केलं जातं. वाद किंवा भांडण अधिक टोकाला गेलं असेल, तर पोलिस ठाण्यात वरात जाते. तिथे कायदेशीर सर्व प्रक्रिया सुरू होतात. कारवाईतील या वेगामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलिस दलाला यश मिळताना दिसते आहे. पोलिस दलातील अत्याधुनिक यंत्रणा प्रभावी ठरते आहे. पोलिस 'टेक्नोसॅव्ही' होताहेत.
महाराष्ट्र पोलिस स्थापना दिवस नुकताच साजरा करण्यात आला. पोलिस दलातील बदल, अत्याधुनिक यंत्रणांच्या वापराचे परिणाम यावर चर्चा घडली. पोलिसांसमोर वाढत्या गुन्हेगारीचे, सायबर गुन्ह्यांचे, बालगुन्हेगारांचे, नशेखोरीतून गुन्हेगारीचे आव्हान वाढत आहेच. मात्र या आव्हानांचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्थादेखील त्यांच्या हाताशी आली आहे. तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड वाढला आहे. त्यातून लोकांशी कनेक्टिव्हीटी वाढली आहे. लोक सहज पोलिसांशी संपर्क साधू शकत आहेत. त्यातून गुन्हा घडण्याआधी घटनास्थळी पोलिस पोहचण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. हा महत्त्वाचा बदल असल्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना सांगितले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे पोलिसांवर मोठा ताण होता. त्यात मोका, तडीपारीसह प्रतिबंधात्मक कारवाईवर अधिक भर देण्यात आल्या. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. वर्षभरात नावीन्यपूर्ण उपक्रम पोलिस दलाकडून राबवण्यात आले. सरत्या वर्षात जिल्ह्यात ५१ खून झाले. २९५ घरफोडीची नोंद पोलिसांत झाली. सन २०२३ तुलनेत गुन्ह्यांचा आलेख घटल्याचे आकडेवारीवरून दिसून येते, असे अधीक्षकांनी सांगितले.
खुनाच्या प्रयत्नाच्या ५० घटना घडल्या असून त्यातील संशयितांवर तत्काळ कारवाई करण्यात आली. जबरी चोरीचे ६६ गुन्ह्यांपैकी ३३ गुन्हे उघड झाले. सन २०२३ मध्ये ४१५ घरफोड्या झाल्या होत्या. सरत्या वर्षात २९५ घटना घडल्या असून अपवाद वगळता सर्व गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिस दलाला यश आले आहे. चोरीच्या १ हजार १०९ घटना घडल्या असून गतवर्षीच्या तुलनेत ३२३ ने घट झाली आहे. याचबरोबर अत्याधुनिक यंत्रणेचाही पोलिस तपासात मोठा वाटा आहे. 'डायल ११२' मुळे पोलिसांना गुन्हे नियंत्रणात फायदा होतोय.
गस्तीत अत्याधुनिक यंत्रणा
जिल्हा पोलिस दलात यापूर्वी 'आरएफआयडी' ही अत्याधुनिक गस्ती यंत्रणा होती. आता त्यापुढील यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यातून गस्तीपथकाचा 'मिनिट टू मिनिट'चा प्रवास दिसून येतो आहे. पोलिसांची प्रभावी गस्त होत असल्यानेच गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात यश येईल, असा विश्वास पोलिसांना वाटतोय.
शहर सीसीटीव्हीच्या नजरेत
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शंभरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या त्या माध्यमातून आतापर्यंत पन्नासहून अधिक गुन्हे उघडकीस आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही बडगा उगारण्यात आला आहे.
'गुन्हे सिद्धी'मध्ये सांगली अव्वल
गुन्हेगारांच्या गुन्ह्यांची माहिती आणि त्यावर अधिक लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांकडून ऑनलाईन पद्धतीने गुन्ह्यांची नोंद घेतली जाते. सीसीटीएनएस (क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम) प्रणाली नावाने कार्यरत असलेल्या या कामकाजात सांगली पोलिस दलाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.
बातमी सौजन्य - दैनिक सकाळ