| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ जानेवारी २०२५
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सात कलमे कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे. त्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक होऊन शंभर दिवसात राबविण्यात येणाऱ्या कामाबाबत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. या सात कलमी कार्यक्रमांमध्ये शासकीय कार्यालयांची स्वच्छता हा एक भाग आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या संकल्पनेतून, सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, व त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखांमध्ये संबंधित विभागाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः श्रमदान करून सर्व कार्यालये व बाहेरील परिसर यांचे स्वच्छता केली. यावेळी स्वच्छता अभियानामध्ये एकत्रित झालेल्या कचऱ्याचे योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
पोलीस कार्यालयाचा तसेच बाहेरील परिसर स्वच्छ झाल्यानंतर मिळालेला आनंद व स्वच्छ व सुंदर वातावरण, यामुळे दर शनिवारी जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, तसेच सर्व पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय व परिसर तसेच पोलीस अधीक्षक सांगली कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखांचे संबंधित प्रमुख अधिकारी व अंमलदार यांनी श्रमदान करून कार्यालय व परिसर स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पोलीस मुख्यालय व सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे चकाचक झाल्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.