| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. १४ जानेवारी २०२५
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या निष्क्रियतेमुळे करवाढीचे भूत मानगुटीवर बसले आहे. करवाढीबाबत कोणतेही तांत्रिक आधार न घेता देण्यात आलेल्या नोटीसांमुळे नागरिकांमध्ये भितीबरोबरच संतापाची भावना निर्माण झाली आहे. अन्यायकारक करवाढीला विरोध करण्यासाठी महापालिका करवाढ विरोधी कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय मिरजेतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
मिरज सुधार समितीच्या पुढाकाराने रविवारी सायंकाळी लक्ष्मी मार्केट परिसरातील महात्मा गांधी उद्यानात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत अनेक कार्यकर्ते व मिळकतधारकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. महापालिका क्षेत्रातील घरपट्टी वाढीसाठी मिळकतींचे मापे घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी एजन्सीला नेमले होते. एजन्सी कर्मचाऱ्यांनी पार्किंग, खुली जागा, बांधकाम याचे सरसकट मापे घेतली आहेत. ज्या ठिकाणी मिळकतधारकांचे आडनाव जुळत नाही, अशा सर्वच मिळकतींना भाडेकरु असा उल्लेख करून व्यवसायिक दर आकारला आहे.
व्यवसायाचे वर्गीकरण न करता एकाच प्रकारचे व्यवसायिक कर आकारण्यात आले आहे. करात उल्लेख केलेल्या कोणत्याही सुविधा नसतानाही कर आकारला आहे. अतिक्रमण केलेल्या मिळकतींना सुध्दा नोटीसा दिल्याने भविष्यात अतिक्रमण हटविताना कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. मिळकतींचे मापे घेण्यात अनेक त्रुटी बरोबरच करवाढीची नोटीसा देताना कोणतेही तांत्रिक बाबींचा आधार न घेतला गेला नाही, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका ड वर्गात असताना अ वर्गाच्या महापालिकांपेक्षाही अधिक करवाढीची नोटीसा दिल्या आहेत. करवाढीच्या नोटीसांबाबत आयुक्त शुभम गुप्ता अनभिज्ञ आहेत. आयुक्तांच्या निष्कर्षयतेमुळे मिळकतधारकांच्या मानगुटीवर करवाढीचे भूत बसले आहे, अशी टीका कार्यकर्त्यांनी केली. अन्यायकारक करवाढी विरोधात लढा उभारण्यासाठी महापालिका करवाढ विरोधी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
बैठकीस अॅड. सी. जी. कुलकर्णी, अॅड. सी. ए. पाटील, माजी नगरसेवक विठ्ठल खोत, सज्जाद भोकरे, शेतकरी संघटनेचे महादेव कोरे, शिवसेनेचे तानाजी सातपुते, शाकेरा जमादार, खादीम जमाअतीचे असगर शरीकमसलत, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र गाडे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे विलास देसाई, अभिजीत शिंदे, मॉर्निंग ग्रुपचे रवि अटक, किरण भुजगडे, पानपट्टी असोसिएशनचे इम्रान मर्चंट, आरपीआयचे संतोष जाधव, राजू कांबळे, भुपाल साबळे, संपतराव खटावकर, सलीम मगदूम, मोरेश्वर कानिटकर, मौला कुरणे, नरेंद्र मोहिते, परशुराम दोरकर, सुरेश झेंडे, जयदिप बागकोटे, उमेश कुरणे, दत्त्तात्रय कुलकर्णी, जमीर सनदी, रफिक खतीब, राकेश कोळेकर, अॅड. शमशोद्दीन शिरोळकर, अशोक शहा, तौफिक कोतवाल, हणमंत पुजारी, शिवशंकर पारशेट्टी यांच्यासह मिरज सुधार समितीचे पदाधिकारी, विविध पक्षाचे कार्यकर्ते व मिळकतधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.