yuva MAharashtra सांगलीत नागरिकांचा जीव झाला स्वस्त, अवघ्या पन्नास रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्डवरून तरुणाचा खून !

सांगलीत नागरिकांचा जीव झाला स्वस्त, अवघ्या पन्नास रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्डवरून तरुणाचा खून !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ जानेवारी २०२५

नागरिकांचा जीव स्वस्त झाला आहे की काय अशा घटना सध्या सांगली शहरात घडत आहेत. छोट्या छोट्या कारणावरून, पैशावरून मुडदे पाडले जात आहेत. एका घटनेचा निकाल लागण्यापूर्वीच दुसरी घटना सांगलीत घडत असल्याने, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे. एकीकडे एकापाठोपाठ एक गुन्हे उघडकीस येत असतानाच दुसरीकडे गुन्ह्यांच्या संख्येतही त्याच प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

आज सकाळी सांगली शहरातील बस स्थानकाजवळ गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या भैरवनाथ मोबाईल शॉपी येथे केवळ पन्नास रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्डच्या खरेदीवरून झालेल्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून झाला आहे. विपुल अमृतपुरी गोस्वामी असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

चौघा हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करून विपुल याचा खून केला. घटनेची माहिती मिळताच सांगली पोलिसांनी त्वरीत तपास सुरू केला आणि काही तासांतच तीन हल्लेखोरांना अटक करण्यात यश मिळवले असून आणखी एका आरोपीचे नाव निष्पन्नझाले आहे. हे सर्व हल्लेखोर अल्पवयीन आहेत.


पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय अधिकारी विमला एम., आणि पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या घटनेमुळे रहदारीच्या ठिकाणी खळबळ उडाली असून, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

सांगली शहर पोलिसांच्या पिएसआय महादेव पोवार यांच्या टीमने तातडीने कारवाई करत तिघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सांगली शहरात खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.