yuva MAharashtra तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतीलही; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य !

तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतीलही; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य !

फोटो सौजन्य  - फेसबुक वॉलवरुन

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ जानेवारी २०२५

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात आवश्यक ते निर्णय घेण्यास सक्षम आहेत. जर या प्रकरणात काही तथ्य आढळले, तर ते ताबडतोब धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगतील, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी विशेष तपास पथक (SIT) आणि निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यात आली आहे. वाल्मिक कराड याच्यासह आरोपींना मकोका लावण्याची प्रक्रिया सुरू आहे, तसेच वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. वाल्मिक कराड याला 302 च्या गुन्ह्यात घेण्याची शक्यता आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाविषयी चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. उपोषण आणि धरणे आंदोलन हे लोकशाहीमध्ये प्रत्येकाचे अधिकार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्या पूर्ण केल्या आहेत. १८०० विद्यार्थ्यांनी केंद्राच्या ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटवर प्रवेश घेतला आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिल्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये राहता येत नाही, परंतु त्या विद्यार्थ्यांना या वर्षासाठी केंद्राचे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मान्य करून प्रवेश दिला आहे. म्हणून आता मागणी करा, चर्चा करा, मार्ग निघेल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


महायुतीतील नाराजीबद्दल चंद्रकांत पाटील म्हणाले, 'जिवंत माणसांनाच एखादी गोष्ट आवडते आणि नावडते. त्यामुळे जिवंत माणसांमध्ये रुसवे फुगवे असतात. कुटुंब प्रमुख रुसवे फुगवे संपवतात. आमचे कुटुंब प्रमुख दाओसला गेले होते. ते आता परतले आहेत. ते रुसवे फुगवे काढतील.'

सांगली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. जे लोक ड्रग्सबद्दल माहिती देतील, त्या माहितीच्या आधारे मुद्देमाल जप्त केला जाईल आणि त्यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ड्रग्सविरोधी कारवाई सुरूच राहील, नाही झाली तरी मी रस्त्यावर उतरेन, असेही त्यांनी इशारादाखल सांगितले.

दुष्काळामुळे जत तालुक्यात पिण्याचे आणि शेतीचे पाणी पुरेसे मिळत नव्हते. परंतु आता टेंभू योजनेतून जत तालुक्याला प्रत्येक कानाकोपऱ्यात तलावाचे पाणी पोहोचण्याचे काम जवळजवळ 60% पूर्ण झाले आहे. लवकरात लवकर ते पूर्ण होईल, त्यामुळे जत तालुक्यातील दुष्काळाचा प्रश्न मिटला आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.