yuva MAharashtra मराठी माणसाचा अपमान झाला आणि मुंबईत वानखेडे स्टेडियम तयार झालं, मैदान बनण्यामागची रंजक गोष्ट जाणून घ्या !

मराठी माणसाचा अपमान झाला आणि मुंबईत वानखेडे स्टेडियम तयार झालं, मैदान बनण्यामागची रंजक गोष्ट जाणून घ्या !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ जानेवारी २०२५
भारतीय क्रिकेट चाहते आणि मुंबईचे वानखेडे स्टेडियम यांचे अतुट नाते आहे. कारण या मैदानावरच भारताने २०११ चा वर्ल्डकप जिंकला, याच मैदानावर सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली. तसेच, याच मैदानावर रवी शास्त्री याने ६ चेंडूत ६ षटकार ठोकले होते. 

वानखेडे स्टेडियम हे केवळ एक मैदान नाहीतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या भावनिक आठवणींचे भांडार आहे. आज त्याच वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने वानखेडे स्टेडियमवर आज मुख्यमंत्री आणि मुंबईच्या आजी माजी खेळाडूंच्या उपस्थितत एक खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

दरम्यान, मुंबईतील वानखेडे स्टेडियमची निर्मिती कशी झाली हे तुम्हाला माहीत आहे का? हे मैदान बनण्यामागे खूपच रंजक इतिहास आहे. एका मराठी माणसाच्या अपमानानंतर वानखेडे स्टेडियमची उभारणी झाली आहे. वास्तविक, मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमच्या रूपात आधीच एक मैदान होते. पण या ब्रेबॉर्न स्टेडियमशी झालेल्या वादानंतर वानखेडे स्टेडियमची निर्मिती झाली. 

नेमकं काय घडलं?

१९७३ साली विदर्भाचे ज्येष्ठ नेते शेषराव वानखेडे विधानसभा अधक्ष्य होते. तेव्हा राज्यातील काही युवा आमदार त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी कामाच्या तणावातून आराम मिळावा, यासाठी आमदार आणि मंत्र्यांमध्ये क्रिकेट सामना खेळवावा, अशी मागणी केली. वानखेडे यांना ही आयडिया आवडली आणि त्यांनी मागणी मान्य केली. आता आमदार मंत्र्यांमधील सामन्यासाठी मैदान हवे होते, मुंबईत आधीच ब्रेबॉर्न स्टेडियम होते, हे मैदान क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (CCI) यांच्या मालकीचे होते. पण त्यावेळी सीसीआय आणि बॉम्बे क्रिकेट असोसिएशन (BCA) यांच्यात मैदानातील राखीव जागांवरून वाद सुरू होता. अशा स्थितीत CCI आपल्याला मैदान देणार का? असा प्रश्न वानखेडेंच्या मनात आला, पण मंत्री आमदारांची मॅच म्हटल्यावर ते मैदान देतील असा विश्वास त्यांना होता.


मर्चंट यांंनी अपमान करून मैदान दिलं नाही

त्यामुळे ब्रेबॉर्न स्टेडियमची मागणी करण्यासाठी ते काही आमदारांना घेऊन दिग्गज क्रिकेटपटू विजय मर्चंट यांच्याकडे गेले. मर्चंट हे त्याकाळी CCI चे अध्यक्ष होते.  वानखेडेंनी मैदानाची मागणी करताच मर्चंट यांनी मैदान देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. या चर्चेदरम्यान शेषराव वानखेडे आणि मर्चंट यांच्यात शाब्दिक वादही झाला. या वादात, वानखेडे यांनी आम्ही मुंबईत आमच्या मालकीचे स्टेडियम बांधून दाखवू, असे म्हटले. यावर मर्चंट म्हणाले, तुम्ही घाटी लोक काय स्टेडियम बांधणार.

तुम्ही फक्त जागा, पैशांचा बंदोबस्त आम्ही करू

यानंतर सगळ्या मराठी आमदारांना याचा प्रचंड राग आला. ते सर्व तिथून निघाले आणि तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे पोहोचले. सर्वांनी मुख्यमंत्र्यांना झालेला प्रकार सांगितला, तसेच, शेषराव वानखेडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे नव्या क्रिकेट स्टेडियमची मागणी केली. पण त्याकाळी अशी मागणी करणे अतिशयोक्तीचे होते. तसेच, मैदानासाठी प्रचंड पैशांची आवश्यकता होती. शिवाय मुंबईत आधीच एक स्टेडियम होते. यामुळे मुख्यमंत्र्यांनी यासाठी नकार दिला. यानंतर वानखेडे म्हणाले, तुम्ही फक्त आम्ही सांगतो ती जागा द्या पैशांचा बंदोबस्त आम्ही करू."

अशा स्थितीत मुख्यमंत्री वसंतराव नाईक अनेक प्रयत्न करून वानखेडे यांनी मागितलेली जागा क्रिकेट मैदानासाठी देऊ केली. यानंतर वानखेडे यांनी अवघ्या १३ महिन्यांच्या काळात ब्रेबॉर्नपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर अत्यंत देखणे असे क्रिकेट मैदान बांधून दाखवले.  मराठी माणसांचा अपमान झाला म्हणून वानखेडे स्टेडियमची उभारणी झाली. यानंतर आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी जिद्दीच्या बळावर क्रिकेट स्टेडियम बांधून दाखवणाऱ्या शेष वानखेडे यांचे नाव या मैदानाला देण्यात आले. शेषराव वानखेडे यांनी नंतर बीसीसीआयचे अध्यक्षपदही भुषवले.

वानखेडे स्टेडियम ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार

मुंबईचे वानखेडे गेल्या काही वर्षांत अनेक ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार बनले आहे. सुनील गावसकर यांनी १९७८-७९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २०५ धावा केल्या होत्या आणि विनोद कांबळीने १९९२-९३ मध्ये इंग्लंडविरुद्ध २२४ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. तर त्याआधी रवी शास्त्री यांनी १९८५ मध्ये याच मैदानवर एका षटकात ६ षटकार मारले होते वानखेडे स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९७४-७५ मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झाला, त्या सामन्यात क्लाइव्ह लॉईडने शानदार २४२ धावा केल्या होत्या. भारताचा महान कर्णधार मन्सूर अली खान पतौडी याचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता