| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १ डिसेंबर २०२४
महाराष्ट्रात अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर महायुती विनासायास सत्तास्थापन करेल, असा अंदाज होता. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रात सुरु झालेल्या राजकीय नाट्यामुळे महायुतीचा शपथविधी लांबणीवर पडला आहे. आता महायुतीचा शपथविधी ५ डिसेंबरला होईल, असे सांगितले जात असले तरी एकनाथ शिंदे यांची नाराजी आणि मौन पाहता ५ डिसेंबरला तरी महायुतीचा शपथविधी पार पडेल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
या सगळ्यामुळे महायुती विशेषतः भाजपच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने चक्रे फिरवली जात असल्याचे दिसून येत आहे. अशातच भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आता महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची ऑनलाईन बैठक घेतली. त्यामध्ये, भाजपच्या आमदारांनी सरकार स्थापनेपूर्वी आणि स्थापनेनंतर काय-काय काळजी घ्यायची यासंदर्भात या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आलं आहे. महायुतीतील सर्वच मित्र पक्षांच्या गटनेत्यांची निवड झाल्यानंतर आता भाजपचा गटनेता कधी निवडला जाणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे, भाजपचा गटनेता म्हणून कुणाची निवड होईल याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेय तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री
भाजपच्या सर्व आमदारांची बैठक २ किंवा ३ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. तर ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहण्याच्या सूचनाही आमदारांना देण्यात येणार आहे. त्यासोबतच महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जल्लोष करण्याचे देखील बावनकुळे यांनी सांगितल्याची माहिती आहे. त्यासोबतच प्रत्येक जिल्ह्यातून भाजपचे महत्त्वाचे पदाधिकारी शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पासेस देण्यात आलेल्या व्यक्तींनाच आझाद मैदानात प्रवेश दिला जाईल असेही ठरल्याचं कळतंय.
दरम्यान, मुख्यमंत्री पदाचा चेहरा २ डिसेंबरला स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपचा गटनेता ही २ डिसेंबरला निवडला जाणार असून दुपारी १ वाजता विधान भवनात गटनेता निवडीसाठी बैठक होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्टपणे बहुमत मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर लावले असून या बॅनरवर देवेंद्र फडणवीस हे शपथ घेत असतानाचा फोटो लावण्यात आबासाहेब. याच बॅनरवर 'राज तिलक की करो' असा मजकूर सुद्धा टाकण्यात आला आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात मुख्यमंत्री म्हणून असलेली छबी फडणवीस यांचीच असल्याचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या पोहोचवण्यात आल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.