| सांगली समाचार वृत्त |
सातारा - दि. १ डिसेंबर २०२४
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १०५ अंश ताप असून कणकण आल्याने शिंदे काल दिवसभरापासून घराबाहेर पडलेले नाहीत. डॉक्टरांची टीम मुख्यमंत्र्यांना तपासण्यासाठी आली आहे. मुख्यमंत्र्यांना डॉक्टरांनी सद्या सलाईन लावण्याचा सल्ला दिला असून त्यांच्या घरातच त्यांना सलाईन लावलं गेले आहे.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी दरे येथे आले आहेत. सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चाना उधाण आलं होतं.
मात्र आता गावी आल्यानंतर शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या दरे येथील बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल झाली आहे. त्यांच्या शरीराचे तापमान हे १०५ अंश आहे. प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे आज बाहेर पडले नाहीत. त्यांनी घरीच आराम करणे पसंत केले. ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच शिंदे यांची प्रकृती बिघडली असल्याने शिंदे शिवसेनेच्या गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता मुख्यमंत्रीपदाचा मान कोणाला मिळणार यावरून स्पर्धा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. ऐन शपथविधी सोहळ्याची वेळ जवळ येत असतानाच एकनाथ शिंदेंनी थेट गाव गाठलं आहे. ऐन अमावस्येला एकनाथ शिंदे गावी गेल्याने चर्चाना उधाण आलं आहे.
शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला त्यांच्या दरे या गावी आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने केसरकर यांना बंगल्याच्या गेटवरूनच माघारी परतावे लागले. दरम्यान केसरकर मुंबईला रवाना झाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालंय. २८८ पैकी २३६ जागांवर महायुतीने विजय मिळवलाय. महायुतीने या निवडणुकीत निर्विवाद यश मिळवत महाविकास आघाडीचा सुपडासाफ केला आहे.
दरम्यान, महायुतीने विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली होती. मात्र, आता मुख्यमंत्रिपद भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु केले आहे, त्याचाच हा भाग नसावा ना ? अशी शंका विरोधकांकडून उपस्थित होत आहे.