| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ डिसेंबर २०२४
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खडतर परिश्रमातून भारतीय संविधान साकार झाले. त्यांनी देश पालथा घातला आणि भारतीय लोकांचा अभ्यास करुन सर्वांचा विकास व्हावा व समताधिष्ठित भारत निर्माण करण्यासाठी संविधानात तरतुदी केल्या. त्यांनी माणसाच्या मूलभूत गरजांची सन्मानाने पूर्तता व त्याची प्रतिष्ठा यांना संविधानाच्या केंद्रस्थानी ठेवून भारत आणि भारतीय हे सार्वभौम आहेत हे ठणकावून सांगताना आम्ही भारतीय आहोत आणि सारे भारतीय एकमेकांचे बांधव आहेत, सहिष्णुता हा संविधानाचा कणा आहे,
संविधान सुरक्षित तर देश सुरक्षित असे ठासून सांगितले आहे. धर्मनिरपेक्ष भारत मजबूत करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारवाटेवरुन चालणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी केले.
बौध्द धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार यशवंतनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बौध्द विहाराचे अध्यक्ष डॉ. सुधीर कोलप होते. डॉ. भंते यश कश्यपायन यांचे मंगल सान्निध्य होते.
स.८ वा. विहाराचे अध्यक्ष डॉ. सुधीर कोलप परभणी यांच्या हस्ते महाकारुणिक तथागत भ. बुद्ध प. पू. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस धूप - दीप पुष्प यांनी पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करून बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन करून श्रावस्ती विहारामध्ये येऊन सांगता करण्यात आली. डॉ. भंते यशकश्यपायन महाथेरो यांच्या हस्ते महाकारूणिक तथागत भ. बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून त्रिसरण आणि पंचशील ग्रहण करून महापरीनिर्वाण दिनानिमित्त प्रमुख पाहुणे प्रा. एन.डी.बिरनाळे सर यांनी अभिवादन केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनपट मांडला.
प्रा. बिरनाळे पुढे म्हणाले,
पाण्यासाठी सत्याग्रह करणारा जगातला एकमेव नेता, जगामध्ये सर्वाधिक पुतळे असणारा महामानव, कोलंबिया आणि लंडन विद्यापीठातील सर्वात हुशार विद्यार्थी,५०हजार पुस्तकासाठी बंगला बांधणारा एकमेव ग्रंथप्रेमी जगातील शंभर विद्वानांमध्ये नंबर एक, महाविद्वान, अर्थशास्त्रात पीएचडी व डबल डॉक्टरेट झालेला प्रथम दक्षिण आशियाई भारतीय, लंडन विद्यापीठात आठ वर्षाचा अभ्यासक्रम केवळ दोन वर्षे तीन महिन्यात पूर्ण करणारा कुशाग्र बुद्धिमत्तेचा एकमेव विद्यार्थी, तब्बल ५५ पुस्तकांचा लेखक, विसाव्या शतकातील सर्वात बुद्धिमान कायदे पंडित, पाच हजार वर्षाचा विषमतेचा इतिहास केवळ ४० वर्षात बदलणारा एकमेव युग प्रवर्तक, ३२ पदव्या संपादन केलेला जगातील सर्वाधिक उच्चविद्याविभूषित मानकरी, लंडन पार्लमेंट मध्ये जयंती साजरी होणारा एकमेव क्रांतिकारी भारतीय नेता, लंडन म्युझियम मध्ये कार्ल मार्क्स सोबत प्रतिमा असलेला एकमेव भारतीय, सम्राट अशोका नंतर शांतीमय अहिंसक क्रांती करणारा नेता,
ऑक्सफोर्ड विद्यापीठ सर्वेक्षणात १००० वर्षातील १०० विश्वपुरुषांमध्ये चौथा, कायदा ,अर्थशास्त्र ,राज्यशास्त्र, घटनाशास्त्र ,मानव वंशशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, राजकारण, पत्रकारिता, शिक्षण, नीतीशास्त्र, धर्मशास्त्र, व्यापार ,लेखन साहित्य, समाज परिवर्तन इ. ज्ञानशास्त्रात प्रभुत्व असणारा, पाली ,संस्कृत पर्शियन, मराठी, गुजराती, हिंदी, जर्मन, इंग्लिश भाषांचे ज्ञान असलेला एकमेव . पाली भाषा व्याकरण व डिक्शनरी लेखक ,जगातील सर्वात जास्त गौरव गीते असणारा नेता, अनेक देशातील घटनांचा अभ्यास करून २ वर्षे ११महिने १८ दिवसात भारताचे संविधान तयार करणारा एकमेव भारतीय सत्पुरुष, यामध्ये बाबासाहेबांनी सार्वभौम भारतातील जनतेला समाजवाद, धर्मनिरपेक्षता स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता व सनातनी धर्म व्यवस्थेने कष्टकरी स्त्रिया, श्रमकरी, शेतकरी वर्गाला नाकारलेले अधिकार दिले, आपल्या देशाचे नाव निश्चित केले,
भारत कोण्या एका जातीच्या व्यक्तीचा, धर्माच्या मालकीचा नाही तर तो जनतेच्या मालकीचा आहे. भारतात कोणत्याही एका धर्माचे लाड किंवा द्वेष नाही, धर्मनिरपेक्ष समता दिलेली आहे. जात, धर्म, वंश, रंग, प्रदेश भेद नाही. कायद्यासमोर सर्व समान आहेत. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका यांची तरतूद केली. जनतेला कोणताही व देशात कोठेही व्यवसाय, नोकरी करण्याचा अधिकार दिला . आरोप सिद्ध होईपर्यंत जामीन मिळण्याचा अधिकार दिला . सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागता येते, वेट बिगारी बालमजुरी कायदा करून तो संपुष्टात आणला.
धार्मिक उपासनेचे स्वातंत्र्य दिले. अल्पसंख्यांक व मागासवर्गीयांना विकासासाठी विशेष हक्क दिले.
यावेळी डॉ. भंते यशकश्यप महाथेरो यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठेपण आणि संविधानाचे महत्त्व सांगून भ. बुध्दांचे विचारच मानवाला तारणार आहेत. संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. अहंकार हा वाईट आहे असे सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक प्रा. माने व परिचय पारमित धम्मकीर्ति यांनी केले. यावेळी डॉ. सुधीर कोलप, चंद्रकांत चौधरी, पवन वाघमारे, शैलजा साबळे, ॲड. साजिद साबळे व संविधानप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.